शेकापच्या दणक्याने जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन सुरु

। अलिबाग विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा रुग्णालयातील अनेक समस्यांबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने माजी आमदार पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली भेट दिली. यावेळी तीन महिन्यांपासून बंद असलेल्या सी टी स्कॅन मशिन तातडीने दुुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत तातडीने सिटी स्कॅन मशिनची दुुरुस्ती करण्यात आली असून सदर मशिन रुग्णसेवेसाठी कार्यान्वित झाली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली आहे. शेकापच्या दणक्याने सदर सिटी स्कॅन मशिन पुन्हा सुरु झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले असून त्यामुळे आता त्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार नसल्याने शेकापला धन्यवाद दिले आहेत.

शेकाप नेते पंडित पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्यासोबत बैठक घेत सर्व समस्यांचा आढावा घेतला. शेकापच्या या शिष्टमंडळात पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद घरत, अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड मानसी म्हात्रे, माजी उपसभापती अनिल गोमा पाटील, माजी नगरसेवक अजय झुंजारराव, अनिल चोपडा, शहर चिटणीस अशोक प्रधान, वृषाली ठोसर, संजना किर, शहर महिला आघाडीप्रमुख पल्लवी आठवले, माजी सरपंच सत्यविजय पाटील, शेकाप आरोग्य सेलचे रुपेश पाटील आदींचा समावेश होता.

यावेळी इतर समस्यांप्रमाणेच सिटी स्कॅन मशिनी बंद असल्याकडे देखील लक्ष वेधण्यात आले. पंडित पाटील आमदार असताना त्यांच्याच प्रयत्नाने सदर सिटी स्कॅन मशिन जिल्हा रुग्णालयात सीएसआर फंडातून मिळाले होते. याची देखील आठवण यावेळी करुन देण्यात आली. सदर सी.टी. स्कॅन मशिन तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दि.28 जुलै 2022 पासून बंद अवस्थेत होती. त्यामुळे रुग्णसेवेत अडचणी निर्माण होत होत्या. परंतु आता या मशीनची दुरुस्ती करण्यात आली असून ही मशीन रुग्णसेवेसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे, असे जिल्हा रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.

Exit mobile version