अर्धा एकरात दहा टनाचे उद्दिष्ट
| माणगाव । वार्ताहर ।
लहरी पर्जन्यमानामुळे भातशेती धोक्यात आली असतानाच तालुक्यात हळदीची झालेली यशस्वी लागवड शेतकरी कष्टकर्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेतीचे उत्पादन घेतले जाते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये लांबणार्या पावसामुळे भातशेती संकटात सापडत आहे. कापणीच्या हंगामात पाऊस लांबत असल्यामुळे भात शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. भातशेती तोट्यात जात असल्यामुळे शेतीचे क्षेत्रही कमी होत आहे. यामुळे तालुक्यातील प्रगतशील शेतकरी शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करत असून तालुक्यातील इंदापूर येथे मुंबई गोवा महामार्गालगत शेतकरी राजेंद्र कोळवणकर यांनी जैविक हळदीची केलेली यशस्वी लागवड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
पारंपारिक शेतीच्या मागे न लागता शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग त्यांनी केले असून तालुक्यात पहिल्यांदाच मल्चिंगद्वारे हळदीची लागवड केली आहे. महामार्ग लगत असलेल्या शेतीमध्ये त्यांनी अर्धा एकर क्षेत्रावर हळदीची लागवड केली आहे. नऊ महिन्यांचे असलेले हे पीक बहरास आले असून डिसेंबर अखेर त्याची काढणी केली जाणार आहे. अर्ध्या एकर क्षेत्रातून त्यांना दहा टन हळदीचे लक्ष असून अतिशय जोमाने वाढलेले हळदीचे पीक उत्तम असल्याचा निर्वाळा दापोली कृषी विद्यापीठासह रोहा शेतकी शाळेतील कृषी अधिकार्यांनीही दिला आहे. मल्चिंगद्वारे हळद लागवडीचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न असून या प्रयत्नांमुळे तालुक्यातील शेतकर्यांना एक वेगळी दिशा प्राप्त झाली आहे. मल्चिंग मुले शेती कामात येणारे अन्य अडथळे किंवा खर्च हा त्यांचा अतिशय कमी झाला आहे.
साधारणतः दीडशे किलो हळदीचे वाण त्यांना लागले असून तण काढण्याचा खर्च तसेच इतरही अनावश्यक खर्चात कपात झाली आहे. पूर्णतः जैविक पद्धतीने त्यांनी ही लागवड केली असून तालुक्यातील शेतकर्यांना वेगळे शेतीचे क्षेत्र यामुळे खुले झाले आहे. लहरी हवामानामुळे तालुक्यात पारंपारिक शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हळदीच्या लागवडीतून चांगल्या प्रकारचे उत्पादन घेता येऊ शकते ही बाब आम्ही या निमित्ताने सर्वांसमोर आणली असून, अर्ध्या एकर क्षेत्रातून किमान दहा टन हळदीचे आमचे उद्दिष्ट आहे. पारंपारिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीला आम्ही प्राधान्य दिले असून पूर्णतः जैविक पद्धतीने आम्ही ही हळद लागवड केली आहे. याबाबतचे शेतकर्यांना मार्गदर्शन तसेच अन्य मदतही आम्ही देत आहोत.
राजेश कोळवणकर
इंदापूर प्रगतशील शेतकरी