| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरातील दाबक पाखाडी परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली गुलमोहराची जिवंत झाडे बाजूच्या जागा मालकाने संबंधित प्रशासन किंवा वनखात्याची कोणतीही परवानगी न घेता कापून टाकल्याची घटना घडली आहे. अंदाजे 50 वर्ष वयाचे हे झाड या ठिकाणच्या नागरिकांना सावली देण्याचे काम करत होते. त्याचप्रमाणे त्याच्यावरती गुलमोहर फुलल्यानंतर त्या ठिकाणचे दृश्य अतिशय मनमोहक दिसत होते. त्यामुळे निसर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
श्रीवर्धन येथील अंजुमन हायस्कूल समोर राहणारे बर्डे हे मुंबई येथे वास्तव्यास असतात. त्यांची त्या ठिकाणी वाडी आहे. या वाडीच्या जागेमध्ये पूर्वी चाळ होती. या चाळीमध्ये श्रीवर्धनचे जुने कोर्ट देखील होते. मात्र, मागील वर्षी या वाडीची कुंपण काढून संपूर्ण चारी बाजूंनी पत्रे ठोकण्यात आलेले आहेत व आतमध्ये इमारत बांधण्याचे काम सुरू करण्याचा संबंधित जागा मालकाचा इरादा आहे. त्यामुळे समोरच असलेली दोन मोठी झाडे त्यांना अडथळा ठरत होती. त्यासाठी त्यांनी झाडे कापल्याचे उघड उघड बोलले जात आहे.
आधीच श्रीवर्धन शहरात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक मोठमोठाले वृक्ष उन्मळून पडली आहेत. नारळ सुपारीच्या झाडांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे श्रीवर्धन शहरावर असलेली सावली काही प्रमाणात नाहीशी झाली असतानाच, अशा प्रकारे जर का झाडांची कत्तल होत राहिली तर श्रीवर्धन शहराचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी खंत काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे. परंतु, काही बांधकाम व्यवसायिकांना या ठिकाणच्या असलेल्या वाड्या तोडून, टोलेजंग इमारती उभ्या करावयाच्या आहेत. त्यासाठी अशा प्रकारचे उद्योग सुरू आहेत. याबाबत वनखात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांजवळ संपर्क साधला असून त्यांच्याकडून तसेच श्रीवर्धन नगर परिषदेकडून देखील वृक्ष तोडण्याची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता वनविभागाने संबंधित जागा मालकावरती गुन्हा दाखल करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.







