एक हजार वाहने दाखल, जंजिऱ्यावर पाच हजार पर्यटक
| मुरूड जंजिरा | सुधीर नाझरे |
दिपावली सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी मुरूड तालुक्यातील काशीद, मुरूड बीचवर पर्यटकांची मोठी मांदियाळी उतरल्याचे शनिवारी दिसून आले. पहिली आंघोळ आणि लक्ष्मीपूजनाचा विधी उरकून मुंबई- पुणे, ठाणे, पश्चिम महाराष्ट्रातून असंख्य पर्यटक दिपावली सुट्टी समुद्रकिनारी एन्जॉय करण्यासाठी डेरे दाखल झाले आहेत. पर्यटकांची सुमारे एक हजार वाहने परिसरात दाखल झाल्याचे काशीद येथील सूर्यकांत जंगम आणि मुरूड येथील हिरा रेसिडेंसीचे मालक महेंद्र पाटील, साईगौरी रेस्ट हाऊसचे मालक आणि जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले. पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर फटाके फोडून दिवाळीचा आनंद लुटल्याचे श्री. बैले यांनी सांगितले.
दिवाळीच्या पाडव्याच्या दिवसापासून चित्र बदलून काशीद, मुरूड आदी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचा पूर लोटल्याचे चित्र दिसत आहे. पर्यटन व्यवसायाला पुन्हा उर्जितावस्था आली आहे. हजारोंच्या संख्येने पर्यटकांची मांदियाळी समुद्रकिनारी आनंद लुटण्यासाठी उतरली आहे. ठिकठिकाणी निवास व्यवस्था, हॉटेलिंग गजबजून गेले आहेत. दिवाळी सुट्टी असल्याने पर्यटकांची हजेरी स्थिर राहील अशी माहिती महेंद्र पाटील, सूर्यकांत जंगम यांनी दिली. मुरूडमध्ये दरबार रोडवर असणाऱ्या हॉटेल शोअर लाईन या पूर्ण शाकाहारी हॉटेलला अनेक पर्यटकांनी भेट देत शुद्ध शाकाहारी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतल्याचे हॉटेलचे मॅनेजर धर्मेश मोरे यांनी सांगितले.
पर्यटकांच्या वर्दळीने जंजिरा जलदुर्ग गजबजला आहे. राजपुरी जेट्टी, खोरा बंदर जेट्टी, दिघी बंदर जेट्टीवरन पर्यटकांना जंजिऱ्यात जाण्याची जल प्रवासाची सुविधा असून असंख्य पर्यटक जंजिरा पाहण्यासाठी येताना दिसत आहेत. पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी सांगितले की, दोन दिवसात जंजिरा पाहण्यासाठी सुमारे 5 हजार पर्यटकांनी भेट दिली. जंजिऱ्यात प्रवेश करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला रु 25/ तिकीट असून 15 वर्षा खालील मुलांना विनामूल्य प्रवेश आहे. ऑनलाईन तिकीट काढल्यास रु20/- तिकीट आहे अशी माहिती येलीकर यांनी दिली. नांदगाव येथील सिद्धिविनायक देवस्थान, मुरूड येथील श्री दत्त देवस्थान, साळाव येथील गणेश देवस्थानलादेखील पर्यटक भेटी देऊन दर्शनाचा लाभ घेत आहेत.







