जेएनपीए बंदरात चक्री वादळाचा तडाखा; कंटेनरसह तीन कामगार हवेत फेकले गेले

दोघांची प्रकृती चिंताजनक

| उरण | प्रतिनिधी |

चक्री वादळाचा फटका जेएनपीए बंदरातील न्हावा शेवा फ्रीपोर्ट टर्मिनलला बसला असून, सोमवारी (दि. ६) सकाळी जहाजावरील कंटेनर उतरविण्याचे काम करत असताना तीन कामगार कंटेनरसह हवेत फेकले गेल्याची धक्कादायक घटना घडली. या तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही आपत्ती व्यवस्थापन तसेच अन्य आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध न झाल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

उरण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक भाग जलमय झाले असून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच सोमवारी सकाळी जेएनपीए बंदरातील न्हावा शेवा फ्रीपोर्ट टर्मिनल येथे ही दुर्घटना घडली. जहाजावरील कंटेनर उतरवित असताना प्रचंड वाऱ्याच्या तडाख्यामुळे कंटेनर हलल्याने तीन कामगार हवेत फेकले गेले. या अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतरही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि आवश्यक मदत तातडीने उपलब्ध न झाल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात येत असून, यामुळे कामगारांमध्ये संताप आणि नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत जेएनपीए बंदर प्रशासनातील अधिकाऱ्यांशी तसेच रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे आणि उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वृत्त लिहिपर्यंत त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नव्हती.

Exit mobile version