| अलिबाग | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील कित्ते भंडारी समाजाच्यावतीने श्रीकालभैरव मंदिरात भव्य अश्वारूढ मुर्तीची प्रतिष्ठापना दर वर्षी करण्यात येते. मुरुड भंडारवाडा येथील श्रीकालभैरव मंदिरात गेली दिडशे वर्षांहून अधिक काळ ही परंपरा भंडारी समाज बांधव जोपासत आहेत.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सात दिवस आधी या मुर्तीची स्थापना करण्यात येते. व दहीहंडीच्या दिवशी सर्व हंड्या फोडल्यानंतर रात्री विसर्जन करण्यात येते. दरम्यान, मुरुडमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) शहर शाखेतर्फे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मुरुड बाजारपेठेत गेली पंधरा वर्षे खास महिलांसाठी मानाची दहीहंडी बांधण्यात येते. ही दहीहंडी यंदाही श्रीकाळभैरव गोविंदा पथकाने फोडून मानाचे चषक पटकावले.

रोह्यात पारंपारिक पद्धतीने गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील तीन्ही प्रमुख आळ्यांमधुन गोविंदा निघाला. दुपारनंतर एकामागुन एक असे ठरलेल्या क्रमाने हे गोविंदा रोहा बाजारपेठेत आले. त्यानंरत येथील उंच दहीहंड्या फोडण्यात आल्या. हे क्षण पाहण्यासाठी नागरिकांनी बाजार पेठेत मोठी गर्दी केलेली होती.

उरण तालुक्यातील टाकीगावात राधाकृष्ण मंदिरात कृष्ण श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आयोजन करण्यात आले होते. तर चिरनेर गावात कातळपाडा, मधीलपाडा, मुळपाडा, रांजणपाडा, कुंभारपाडा, तेलीपाडा या पाड्यांमध्ये दहीहंडीचा उत्साह दिसून आला.

अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्ण भक्तांनी व बाळगोपाळांनी ढोल-ताशांच्या गजरासह पारंपरिक गीतांच्या ठेक्यावर गल्लोगल्ली जाऊन दहीहंड्या फोडल्या. यावेळी सर्वामध्ये एकच उत्साह वाढला होता.

पोलादपूर शहरातील श्रीकाळ भैरवनाथ देवस्थान उत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही खासगी आणि सार्वजनिक दहीहंड्या फोडण्याचे एक नियमबद्ध नियोजन करण्यात आले होते. या नियोजनानुसारच शहरातील 25 दहीहंड्या फोडण्याची संधी शहरातील 13 नगरांना देण्यात आली होती.

महाड तालुक्यासह शहरात ‘अरे बोल बजरंग बली की जय’च्या जयघोषात आणि वरुण राजाच्या साक्षिने संपूर्ण दहीहंडी उत्सव प्रचंड उत्साहात व तेवढ्याच जल्लोशात पार पडला.

तळा तालुक्यात पारंपरिक पद्धतीने जल्लोषात दहीकाला उत्सव साजरा करण्यात आला. बाळगोपालांसह जेष्ठ नागरिक देखील आनंदाने दहीकाला उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी पारंपरिक पद्धतीने खालुबाजाच्या ठेक्यावर बाळ गोविंदांसह मोठ्यांपर्यत सर्वांनी फळी धरून खालुबाजावर ठेका धरला होता.

उरण तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दहीहंडीमध्ये एक व्यक्ती दुसऱ्यावर चढून मानवी थर तयार करतात आणि हंडी फोडतात. मात्र, चिरनेर गावात ग्रीस लावलेल्या मल्लखांब दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी विशेष गर्दी केली होती.

पाटणसई गावातील गोविंदा पथकाने सुमारे 80 वर्षांपासुन आजपर्यंत नागोठणे विभागासह रोहा तालुक्यात आपली परंपरा, नावलौकीक व आकर्षण आजही टिकवुन ठेवले आहे.

अलिबाग तालुक्यातील चोंढी पंचक्रोशीत श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी चोंढी येथे पहिल्यांदाच प्राप्ती गायकवाड या लहान मुलीने दहीहंडी फोडली.

उलव्यात शनिवारी दहिहंडीचा थरार पाहायला मिळाला. सेक्टर 18 येथे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी आणि उरण विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यातर्फे 5 लाख 55 हजार 500 रुपयांची बक्षिसे दहिहंडीसाठी होती.

महाड तालुक्यातील खुटिल मुळगाव येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुंबई, पुणे व महाड येथून युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या गावाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचे काम करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव रोह्यातील कुंडलिका नदी संवर्धन पार्किंग मैदानात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील 62 गोविंदा पथकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत श्री वाकेश्वर गावदेवी गोविंदा पथक किल्ला व जय भवानी रोठखुर्द गोविंदा पथकाने सर्वाधिक 8 मानवी मनोरे रचत मुख्यहंडीचे पारितोषिक पटकावले.







