दुग्धव्यवसायाला मिळाली नवी चालना; तरूणांना रोजगाराची मोठी संधी
| पाली/वाघोशी | वार्ताहर |
दुधाचा व्यवसाय परवडत नसल्याने सुधागडातील अनेक शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता खूप शेतकरी व पशुपालक या क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः यात तरुणांचा सहभाग उल्लेखनीय आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर दूध संकलन वाढत असून, खासगी दुग्धजन्य पदार्थ उत्पादक व डेअरीला मोठ्या प्रमाणात दूध पुरवठा केला जात आहे. त्यातून रोजगाराची देखील मोठी संधी उपलब्ध झाली असून, ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होत आहे.
येथील शेतकऱ्यांनी सांगितले की, दिवसाला 15 ते 70 लिटर दुधाचे उत्पादन घेत असून, ते खासगी दूध संकलन केंद्राला पाठवतो. या माध्यमातून सर्व दुधाची विक्री जागेवरून होते. भाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे कष्ट व श्रम वाचतात आणि रोजगार देखील मिळतो. असे अनेक शेतकरी मागील दोन-तीन वर्षांपासून खासगी दूध संकलन व्यावसायिकाला दूध विकून अर्थार्जन करत आहेत. तर, काही तरुण शेतकरी व दुग्ध उत्पादक अगदी नव्याने या व्यवसायात उतरले आहेत. सध्या सुधागड तालुक्यातील झाप पासून नाडसुर, नांदगाव, सिद्धेश्वर, नेणवली आदी अनेक भागातून दररोज शेकडो लिटर दूध संकलित होत आहे. म्हशीच्या दुधाला 50 रुपये प्रति लिटर, तर गायीच्या दुधाला 35 रुपये प्रति लिटर भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत.
तरुण शेतकरी दुग्ध व्यवसायात पुढे
काही वर्षांपूर्वी जे शेतकरी जमीन विकून गाडी किंवा घर बांधण्याचे स्वप्न पाहत होते, तेच आता नव्याने जमीन खरेदी करून चाऱ्याची लागवड करण्याचा विचार करत आहेत. दररोज 500 ते 5 हजार रुपये कमावणारे तरुण शेतकरी या भागात उद्योजक म्हणून उभे राहत आहेत.
70 ते 80 च्या दशकात सुधागड तालुक्यात दुग्ध व्यवसायाचा खूप मोठा प्रभाव होता. घरोघरी गायी-म्हशी होत्या आणि शेतकऱ्यांना आठवड्याला नियमित पैसे मिळत. परंतु, 1990 नंतर हा व्यवसाय मंदावला होता. आता पुन्हा तरुण पिढी या व्यवसायाकडे वळत आहे. तालुक्यात जणू काही गोकुळच प्रस्थापित होत आहे, असे वाटते. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना तर मिळत आहेच, त्याचबरोबर पशुधन वाढतांना दिसत आहे. शासनाने हे व्यावसायिक व शेतकऱ्यांसाठी अनुदानाच्या काही योजना द्याव्यात.
महेश पोंगडे,
शेतकरी, वाकणगावाडी