। चिपळूण । प्रतिनिधी ।
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुरुवार दि. 5 जून रोजी चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते रेल्वे फाटक येथे सकाळी 8 वाजता देवराई वृक्ष लागवडीचा शुभांरभ करण्यात आला. यावेळी 149 प्रजातींच्या 1 हजार 252 वृक्षांचे रोपण करण्यात आले.
अत्याधिक कार्बन उत्सर्जनामुळे होणारी जागतिक तापमान वाढ आणि त्यातून होणारे अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, चक्रीवादळे इत्यादी स्वरूपातील वातावरणीय बदल ग्रामीण भागावर गंभीर परिणाम करीत आहेत. या पर्यावरणाच्या संकटाला तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाद्वारे वातावरणातील कर्बनवायू शोषून घेणे आवश्यक आहे. तसेच, जैवविविधतेचे जतन करण्यासाठी देवराया व घनवने तयार करणे हा प्रभावी उपाय आहे. राज्यात मानवनिर्मित देवराया व घनवने तयार करण्यासाठी शासनाने वनीकरण क्षेत्रात अनुभव असणार्या देवराई फाउंडेशन, पुणे या संस्थेद्वारे राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक मानवनिर्मित देवराई व घनवन तयार करण्यात येणार आहे.