प्रवाशांच्या त्रासाचा दळवींना बसणार फटका

दळवी पुन्हा आमदार नको, अनेकांची संतप्त प्रतिक्रिया

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग-रोहा मार्गावरील रस्ता स्वखर्चाने करेन, अशी बतावणी करीत आमदार दळवी यांनी मागील निवडणुकीत मते मिळविली. परंतु, या मार्गावरील प्रवाशांची घोर निराशा आमदारांनी केली आहे. मार्गावर खडीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. धुळीमुळे श्‍वसनाचा त्रास होत आहे. आमदारांबाबत अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुन्हा दळवी आमदार नको, अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे. निवडणुकीत दळवींना प्रवाशांच्या त्रासाचा फटका बसणार असल्याची चर्चा गावपातळीवर होत आहे.

अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला, हे मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या खानाव येथील सभेमध्ये शेकापचे नेते जयंत पाटील यांनी पुराव्यासहीत दाखवून दिले होते. तरीदेखील त्या रस्त्याचे श्रेय आमदार दळवींनी घेत अनेकवेळा नारळफोडीचा कार्यक्रम राबविला. बेलकडे स्थानकाजवळ शासकीय कार्यक्रमही घेतला. गेल्या पाच वर्षांत आमदार नारळ फोडण्यात मग्न राहिले. प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू झाले नाही. भाजपचे जिल्हा माजी उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहीचे पत्र आणून अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे काम मागील 2023 मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सुरु केले.

दुसर्‍या दिवशी शिंदे गटातील आमदार दळवी यांच्या समर्थकांनी पुन्हा बेलकडे येथे नारळफोडीचा कार्यक्रम घेत रस्त्यावरून श्रेयवाद मिळविण्यास सुरुवात केली. त्यामुळे दळवी विरुद्ध भोईर यांचा श्रेयवाद चांगलाच पेटला. या वादामध्ये अजूनपर्यंत अलिबाग-रोहा मार्गावरील रस्ता खड्ड्यातच आहे. पहिला ठेकेदार अर्धवट काम टाकून पळून गेला. दुसर्‍या ठेकेदाराकडे काम सोपविण्यात आले आहे. वेलवली-खानाव ते गेल कंपनीपर्यंत अपूर्ण केलेले काँक्रिटीकरणामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास होत आहे. दोन वर्षांपूर्वी अपूर्ण केलेले काँक्रिटीकरण आता खराब होण्याच्या मार्गावर आहे. त्याच काँक्रिट रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला जेएसडब्ल्यू कंपनीमधील कच्चा माल टाकला आहे. त्याचे कण चालकांसह प्रवाशांच्या नाका-तोंडात जाऊ लागले आहेत. नांगरवाडी ते तळवली या चढणीवरच्या रस्त्यावर खडी पसरली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली संरक्षक भिंत तोडण्यात आली आहे. वाहनचालकांचा वाहनांवरील ताबा सुटल्यास वाहने दरीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
मागील निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती करण्यास आमदार अपयशी ठरल्याने अनेकांनी त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी दळवी आमदार नको, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक गावागावांतून उमटत आहेत.

अलिबाग-रोहा रस्त्याचे काम स्वखर्चाने करेन, असे आश्‍वासन मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदारांनी मते मिळविण्यासाठी दिले होते. परंतु, आजही या मार्गावरील प्रवासी खड्ड्यांतून प्रवास करीत आहेत. प्रवाशांना खूप त्रास होत आहे. आमदार दळवी यांनी घोर निराशा केली आहे. प्रवासी जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करीत आहेत.

मधुकर ढेबे,
माजी सरपंच
प्रशासकीय मान्यता - 215 कोटी रुपये
निविदा - 177 कोटी रुपये
रस्त्याची लांबी - 85.64 किलोमीटर (अलिबाग, रोहा ते साईपर्यंत)
पूर्ण झालेल्या रस्त्याचे काम - 57.40 किलोमीटर
काँक्रिटीकरणाच्या रस्त्याचे अंतर - 4.70 किलोमीटर
Exit mobile version