भाजीच्या मळ्यांना धरणाचा ओलावा

तरुणांच्या मेहनतीतून उत्पन्नाचे साधन

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यात व्यावसायिकदृष्ट्या कोणताही उद्योगधंदा अथवा कारखाना, कंपनी, नोकरी व्यवसाय नसल्याने स्थलांतर ठाणे, मुंबईकडे आहे. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून तालुक्यात वावेहवेली धरणाच्या पाण्याच्या ओलाव्यावर अनेक शेतकर्‍यांनी भाजीपाला लागवड करून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध केले आहे.

या पाण्याच्या ओलाव्यावर वावेहवेली, बामणघर, खैराट, राणेचीवाडी, केळशी वानस्ते, पिटसई, शेनाटे आदी भागात विशेषत: तरूण शेतकर्‍यांनी मिरची, वांग, टॅमॅटो, भेंडी, दुधी भोपळा, कारली, चवळी, हरभरा, तुर, मुग, मटकी, पालेभाज्या कोथिंबीर, माठ, कोबी, फ्लॉवर इत्यादी लागवड करून मोठ्या प्रमाणात भाजीपाला काढत आहेत. त्याचबरोबर कलिंगडही मोठ्या प्रमाणात पिकविले जात आहे. येथील तरूण शेतकरीवर्गाशी चर्चा केली असता ते म्हणाले, आम्ही आजही शेती करीत आहोत. यामध्ये चांगले उत्पन्न मिळत असून, आम्हाला मुंबई अथवा इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही. शेतीतून आम्हाला चांगले उत्पन्न मिळत असून, आर्थिक परिस्थितीत आता बदल झाला आहे. मात्र, कष्ट आणि मेहनत महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजीपाला करताना केव्हा, कशी लागवड करावी, कोणते बियाणे वापरावे, कोणती खते, खतांची मात्रा याविषयी मार्गदर्शन कृषीतज्ज्ञ अथवा माहीतगारांकडून माहिती घेऊन त्या पद्धतीने शेती केली जात असल्याने उत्पन्न व मालाला भाव चांगला मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version