अवकाळीमुळे वीटभट्टींचे नुकसान

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठणे विभागात मागील दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. अधून-मधून अवकाळी पावसाच्या अचानक सरी आल्यामुळे सर्व सामान्य लोकांबरोबरच शेतकऱ्यांची देखील तारांबळ उडाली. नागोठणे विभागात भाताच्या पिकांचे ज्याप्रमाणे नुकसान झाले त्याप्रमाणेच वाल शेतीही धोक्यात आली असून वीटभट्टीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने वीटभट्टीमध्ये वीटा बनवण्यासाठी लागणारी माती वाहून गेली. त्याचप्रमाणे भट्टीत टाकलेल्या विटांचे देखील नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागोठणे विभागातील विटभट्ट्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असल्याने नुकसानग्रस्त वीटभट्टींचे पंचनामे करून शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी वीट व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

नागोठणे विभागात अचानक अधूनमधून वाऱ्यांसह मुसळधार अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे शेतकरी व वीटभट्टी व्यवसायिक मेटाकुटीला आले आहेत. वीटभट्टी व्यावसायीक हे तर कच्ची वीट तयार करीत असताना पडलेल्या पावसाने विटांची पूर्णतः माती झाली आहे. तरी शासनाने याची वेळीच दखल घेऊन या नुकसानग्रस्त वीट व्यावसायिकांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

वीटभट्टीमध्ये काम करण्यासाठी इतर ठिकाणाहून कामगार आणले जातात. परंतु अवकाळी पावसाने नुकसान झाले तरी या कामगारांना पगार आणि रोजची हजेरी द्यावीच लागत आहे. दरवर्षी अवकाळीमुळे वीट भट्टी व्यवसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागते परंतु शासनाकडून कोणतीही मदत होत नाही. त्यामुळे वीटभट्टीचे पंचनामे करून सरकारने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी.

निखिल मढवी, अध्यक्ष, नागोठणे विभाग,
चालक-मालक वीटभट्टी संघटना
Exit mobile version