सुकेळी | वार्ताहर |
नागोठणे विभागासह सुकेळी, वाकण,बाळसई परिसरामध्ये अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे वाल पीक तसेच भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच काही ठिकाणी लग्नासाठी बांधण्यात आलेल्या मंडपाच्या कापडाचे देखिल नुकसान झाले आहे.
दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात गरमी वाढलेली होती. जणु काही अवकाळी पाऊस येणार की काय अशी चिन्हे दिसत असतांनाच ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाने सुरुवात केली. परंतु या मुसळधार झालेल्या अवकाळी पावसामुळे वाळजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अंतिम टप्यात सुरू असलेल्या भात झोडणा-या शेतक-यांची चांगलीच तारांबळ उडवली. अनेक ठिकाणी भात झोडण्याची कामे सुरु असतांनाच अचानक पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे संपुर्ण भात पावसात भिजल्यामुळे भाताचे भरपुर नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास शेतक-यांच्या हातातुन गेल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.
तसेच तुळशी विवाहरंभ पार पडल्यानंतर लगेचच सर्वत्र लग्नाचे बार उडत असतात. म्हणुनच काहींनी तर लग्न कार्यासाठी मंडप बांधले होते. परंतु या पडलेल्या पावसामुळे मंडपवाल्यांचे देखिल अतोनात नुकसान झाले आहे. मागिल वर्षी कोरोनामुळे अनेक लग्नकार्य रद्द झाल्यामुळे यांचा देखिल फटका मंडपवाल्यांना बसला होता. त्यामुळे या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गासह व्यावसायिकांवर देखिल विचार करण्याची वेळ आणली आहे. दरम्यान बाळसई येथे भातझोडणी सुरु असतांनाच अचानक झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या भाताची कृषी सहाय्यक अधिकारी एस .आर .भोईर , ग्रा.पं सदस्य किशोर नावले, सामाजिक कार्यकर्ते अंनत ठमके, दत्ताराम पाटेकर यांनी जाऊन पाहणी केली व शासनाकडुन जेवढे शक्य होईल तेवढी नुकसान भरपाई मिळवुन देण्याचे आश्वासन शेतकर्यांना दिले.
उरण तालुक्यात अवकाळी पाऊस
उरण तालुक्यात बुधवारी आलेल्या संध्याकाळी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतजमिनीत पेरणी करण्यात आलेले रब्बी ( वाद,चवळी,मूग,पावटा पीक धोक्यात आले आहे. तसेच गुरांचा चारा भिजला आहे.त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.तर वीट व्यवसायाचे नुकसान झाले आहे.
मुरूड तालुक्यात विजांचा कडकडाट
मुरूड तालुक्याला बुधवारी पहाटे 3 च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने भिजवून टाकले. अचानक पहाटे अनेकजण भयभीत होऊन दचकून जागे झाले.
माणगावात अवकाळीन नागरिकांची तारांबळ
माणगावसह तालुक्यात मेघ गर्जनेसह बुधवार दि.17 नोव्हेंबर रोजी पाऊस पडल्याने नागरिकांची पुरती तारांबळ उडाली. माणगावात बुधवारी मध्यरात्री मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस पडला.