। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गुरुवारी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर उंचच उंच लाटा धडकत असल्याने या लाटांचे रौद्ररूप पाहण्यासाठी अनेकांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली होती. दरम्यान अलिबाग किनाऱ्यावरील सुशोभीकणाचे या महाकाय लाटांच्या मार्यांमुळे नुकसान झाले आहे. असतानाच जून महिन्यात समुद्राला सहा दिवस मोठी भरती येणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे विविध बंदरांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला असून तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सागरी प्रवासी व पर्यटक वाहतूकदेखील बंद करण्यात आली आहे. गेट वे ते एलिफंटा, जेएनपीए मोरा ते भाऊचा धक्का, करंजा ते रेवस या सर्वच मार्गावरील सागरी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात २२ वेळा मोठी भरती येणार आहे. त्यापैकी जून महिन्यात समुद्राला एकूण ६ दिवस मोठी भरती असून चालू आठवड्यात या भरती येणार आहेत. आज गुरुवार, १६ जून रोजी सर्वांत मोठी भरती आली होती. यावेळी लाटांची उंची ४.८७ मीटरपर्यंत उंचावत होत्या. परिणामी धोक्याच्या तीन नंबरच्या बावटा प्रशासनाकडून लावण्यात आला आहे. दरम्यान, गेटवे ऑफ इंडिया येथून पावसाळी हंगामात दररोज एक ते दीड हजार पर्यटक एलिफंटा लेण्या पाहण्यासाठी जातात. समुद्र सफरीचा आनंद लुटण्यासाठी २५०० ते ३००० पर्यटक येतात. मात्र सर्वच बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आल्याने गेटवे ऑफ इंडिया येथून दररोज होणारी पर्यटक व प्रवासी वाहतूक रविवारपासूनच बंद करण्यात आली आहे. याशिवाय भाऊचा धक्का ते मोरा या सागरी मार्गावरूनही प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने घेतला आहे.