| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यभरात सुरू असलेल्या अवकाळी पावसासह गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवालदिल झालेला बळीराजा मदतीच्या प्रतिक्षेत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच पंचनामे झाल्याबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचे संकट ओढवले होते. राज्यातील एक लाख हेक्टरवरील शेतीला अवकाळीचा फटका बसला. त्यामुळे भात, मका, कांदा, ज्वारी, गहू, हरभरा, केळी, द्राक्ष, कापूस, सुपारीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसाच्या तडाख्याने सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. राज्यभरातून तातडीने पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून 3 हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल. यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याचे एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने यावेळी दिले.