धरणांमधील जलसाठा चिंताजनक; मे मध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील धरणांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लाखो नागरिकांच्या पाणीपुरवठ्याचा आधार असलेल्या धरणांमध्ये जलसाठा तळाला गेल्याने गावागावात टंचाईची चाहूल लागली आहे. उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना पाण्यासाठीची धावपळ तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीतही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
धरणे अक्षरशः तळाला गेली, आणि प्रशासन मात्र अजूनही फाईलांच्या ढिगाऱ्यातच अडकलेले दिसते. उन्हाळा चढत चालला आहे, टंचाई दारात उभी आहे, पण उपाययोजना अजूनही केवळ कागदावरच असल्यामुळे जनतेचा संताप आता उफाळून येत आहे.
मागील वर्षी चांगला पाऊस होऊनही पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने ही वेळ ओढवल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. प्रशासनाकडून उपाययोजनांची तयारी सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात ठोस पावले उचलली गेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मे महिन्यात जिल्ह्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील लाखो नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या लघू पाटबंधारे विभागातील धरणांमधील 27.685 दशलक्ष घन मीटर पाणी संपले असून केवळ 40.83 दशलक्ष घट मिटर इतके पाणी उरले आहे. अलिबागसह सात तालुक्यातील 13 धरणांमध्ये फक्त सात ते 37 टक्के जलसाठा शिल्लक असून सुधागडमधील ढोकशेतमधील धरणात शुन्य टक्के पाणी साठा आहे. त्यामुळे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणांमधील जलसाठा चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील वर्षी मे ते ऑक्टोबरच्या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तब्बल तीन हजार 128 मि.मी. इतक्या पावसाची नोंदही करण्यात आली. पावसाच्या पाण्याने धरणे तुडूंब भरून गेले होते. त्यामुळे यावर्षी पाण्याचा दुष्काळ निर्माण होणार नाही, अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांना होती. एकूण तीन हजार 128 मि. मी. इतका पाऊस पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. परंतू मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही जिल्ह्यात पाण्याचा दुष्काळ कायमच असल्याचे वास्तव उघड झाले आहे. टँकरमुक्त जिल्हा करण्याच्या संकल्पनाच जिल्ह्यात कागदावरच असल्याचे चित्र आहे.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लघू पाटबंधारे विभागाच्या धरणांमध्ये 54 टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र, वाढती उन्हाची तीव्रता, पाण्याची वाढती मागणी अशा अनेक कारणांमुळे धरणांमधील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. जिल्ह्यात उन्हाळी हंगाम सुरु झाला आहे.या हंगामात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील 28 धरणांमध्ये केवळ 40.64 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.या बंधाऱ्यांची एकूण साठवण क्षमता 68.51 दलघमी इतकी आहे. मात्र सध्या फक्त 27.97 दशलक्ष घन मीटर पाणी उपलब्ध आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही वेगाने वाढत आहे. परंतु धरणांमधील पाण्याची पातळी कमी होत असल्याचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना बसत आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, सुधागड, श्रीवर्धन, महाड, कर्जत, खालापूर, उरण या तालुक्यातील 11 धरणांमध्ये सात ते 37 टक्के जलसाठा शिल्लक आहे.मूरूड, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, खालापूर, पनवेल या तालुक्यांतील आठ धरणांमध्ये 40 ते 50 टक्के तसेच तळा, रोहा, पेण, पनवेल, खालापूर, म्हसळा या तालुक्यातील आठ धरणांमध्ये 53 ते 75 टक्के आणि सुधागडमधील ढोकशेत धरणामध्ये शुन्य टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जलसाठा झपाट्यान कमी होत असल्याने पाण्याची चिंता वाढू लागली आहे. पावसाळा सुरु होण्यासाठी अजून दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे पाणी सूरळीत राखणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे पाणी कपातीलादेखील सुरुवात करण्यात आली आहे. काही ठिकाणी एक दिवस, तर काही ठिकाणी दोन ते तीन दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे.
धरणांच्या पाण्यावर पाणी पुरवठा योजना अवलंबून
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या 16 लाखहून अधिक असून दोन हजारहून अधिक गावे व वाड्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अनेक धरणांच्या पाण्यावर ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. मात्र धरणांमधील जलसाठा कमी होत असल्याने त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होऊ लागला आहे. अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच शेतीसह जनावरांच्या पाण्याची सोयदेखील या धरणांमधील पाण्यावर होते. त्यांच्यावर ही परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गाळ काढण्यास प्रशासन उदासीन
डोंगरभागातून पडणारा पाऊस धरणांमध्ये साठला जातो. या पाण्याचे शुध्दीकरण करून जिल्ह्यातील लाखो नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. पावसाळ्यात डोंगरभागातून वाहत आलेला गाळ बंधाऱ्यात साचत आहे. परंतू हा गाळ वेळेवर न काढल्यास पाणी कमी आणि गाळ जास्त अशी स्थिती निर्माण होते. तीन हजार हून अधिक मि. मी. इतके पाऊस पडूनही धरणांमधील जलसाठा कमी होण्यामध्ये धरणांतील असलेला गाळ हे कारण आहे. हे गाळ काढण्यासाठी जिल्हा परिषदेेने प्रयत्न केला. परंतू त्यात त्यांना यश आले नाही.त्यामुळे गाळ काढण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याचे चित्र आहे.
धरणांमधील जलसाठ्यावर दृष्टीक्षेप ( टक्केवारीनुसार)
घोटवडे - 07
ढोकशेत - 00
उन्हेरे - 08
कोंडगाव - 23
कवेळे - 19
रानवली - 19
पुनाडे - 24
श्रीगाव - 35
फणसाड - 44
पाभरे - 40
वरंध - 46
खिंडवाडी - 48
कोथुर्डे - 35
खैरे - 44
साळोख - 32
अवसरे - 32
डोणवत - 37
कार्ले - 48
कुडकी - 50
भिलवले -53
कलोते-मोकाशी -50
बामणोली - 54
उसरण - 54
वावे - 75
सुतारवाडी - 65
आंबेघर - 67
संदेरी -68
मोरबे -64
उन्हेरे -08






