जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईचे संकट
| रायगड | प्रमोद जाधव |
उशीरा दाखल झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे, पाण्याने भरली. मात्र, गतवर्षीच्या तुलनेने यंदा पाऊस कमी पडल्याचा फटका रायगड जिल्ह्यातील नागरिकांना आतापासून बसू लागला आहे. लघुपाट बंधारे विभागाची 20 धरणे फुल्ल आहेत. तरीदेखील पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला असून, अनेक गावे, वाड्यांमध्ये एक ते चार दिवसआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे धरणे फुल्ल आणि दुष्काळ मात्र कायमच असे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
गतवर्षी पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडला होता. यंदा मात्र पंधरा दिवस उशिरा पावसाने सुरुवात केली. रायगड जिल्ह्यामध्ये दीर्घ प्रतिक्षेनंतर सोमवारी (दि.22) जून रोजी पावसाने हजेरी लावली. हा पाऊस जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सलग सुरूच राहिला. त्यामुळे धरणे, नद्या, तलाव पाण्याने तुडूंब भरून गेले. गतवर्षी शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडला. रायगडमध्ये यंदा आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 89.9 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील लघु पाट बंधारे विभागातील 28 धरणांपैकी अलिबागमधील श्रीगांव, श्रीवर्धनमधील कार्ले, रानावली, महाडमधील वरंध, खैरे, तसेच कर्जतमधील साळोख, अवसरे आणि पनवेलमधील बामणोली या धरणांमध्ये 52 ते 99 टक्के जलसाठा शिल्लक आहे. उर्वरित 20 धरणांमध्ये शंभर टक्के पाणी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती चिंताजनक आहे. तीन आठवडे उलटूनही या महिन्याच्या सरासरीच्या केवळ 56.6 टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबरचे अवघे सहा दिवस शिल्लक असल्याने या महिन्यात पावसाची तूट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याची समस्या भीषण होण्याची चिंता जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. परंतु, ऑगस्ट महिन्याबरोबरच सप्टेंबरमध्येही पंधरा दिवस उलटूनही अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे पाण्याने फुल्ल भरलेल्या धरणांसह नदी, तलावमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. गावागावात पाण्याचा दुष्काळ सुरु झाला आहे. अलिबाग तालुक्यासह रोहा, मुरूड तालुक्यातील अनेक गावांमध्ये एक ते चार दिवसआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीकपातीचे संकट जिल्ह्यात सुरु झाल्याचे चित्र समोर आले आहे.
