नद्यांनी धोका, इशारा पातळी ओलांडली
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सतत कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचा पाट वाहात आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. सहाहून अधिक धरणे शंभर टक्के, तर 12 हून अधिक धरणांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत भरली आहेत. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी अंबा नदीने धोक्याची, तर कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे शेतकरी सुखावून गेला असला, तरी पाऊस पडल्यावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना हा पाऊस नकोसा झाला आहे. या पावसात पेरणीची रोपे कुजून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये 6 जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार व मध्यम स्वरुपात पाऊस कोसळला. अनेक सखल भागात पाणी साचले असून, रायगड जिल्ह्यातील संपूर्ण भाग जलमय झाला आहे. रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहात आहेत. त्यामुळे पाण्यातून वाट काढण्याची वेळ चालकांसह पादचाऱ्यांवर आली आहे.
कोकणात 285.4 मि.मी. पाऊस कोसळला आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये 345.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, उरण, मुरुड, पेण, माणगाव, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा, पोलादपूर या तालुक्यांमध्ये 225.4 मि.मी.पासून 464.9 मि.मी.पर्यंत पाऊस पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रायगड पाटबंधारे विभाग, कोलाडच्या अखत्यारित येणारी 28 धरणे पाण्याअभावी कोरडी पडली होती. मात्र, सतत सुरु असलेल्या पावसामुळे या धरणांमध्ये जलसाठा होऊ लागला आहे. जिल्ह्यातील सुतारवाडी, म्हसळ्यातील पाभरे, संदेरी आणि महाडमधील खैरे, सुधागडमधील कोंडगाव, उन्हेरे या धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा आहे. तळामधील वावेमध्ये 50 टक्के, महाडमधील वरंध, श्रीवर्धनमधील कुडकीमध्ये 57 टक्के, खालापूरमधील भिलवलेमध्ये 78 टक्के, महाडमधील कोथुर्डेमध्ये 66 टक्के, श्रीवर्धनमधील कार्ले, पेणमधील आंबेघर, या धरणांमध्ये 42 टक्के पाणीसाठा आहे. उर्वरित धरणांमध्ये तीन टक्क्यांपासून 36 टक्के जलसाठा आहे. कोरडी पडलेली धरणे या पावसात भरू लागली आहे. काही धरणे फुल्ल झाली आहेत, तर काही धरणांमध्ये पाणी कमीच आहे. पाऊस पडल्याने जिल्ह्यातील पाण्याची वणवण थांबली असली, तरी अनेक धरणांमधून येणारे गढूळ पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळेे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंबा नदीने धोका पातळी ओलांडली
जिल्ह्यातील महाडमधील सावित्री नदी, खालापूरमधील पाताळगंगा कर्जतमधील उल्हास, पनवेलमधील गाढी नद्या ओसंडून वाहात आहेत. या नद्यांमधील पाणी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. मात्र, रोहा तालुक्यातील नागोठणे येथील अंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. रोहा तालुक्यातील डोलवहाल येथील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. या नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन प्रसंगी सुरक्षित ठिकाणी तातडीने आश्रय घ्यावा, असे रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.






