महामार्गावरील भरधाव वाहनांमुळे अपघाताची शक्यता
| नागोठणे | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आणि नागोठण्याजवळील वाकण पुलाच्या पुढे असलेल्या बाळसई गावाकडे जाण्यासाठी असलेल्या वळणावर अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून, हे ठिकाण अपघाताचा ‘डेंजर स्पॉट’ बनले आहे. महामार्गावरून धावणाऱ्या भरधाव वाहनांमुळे येथे मोठ्या अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, बाळसई कडील वळणावर सुरुवातीलाच दोन जीवघेणे खड्डे पडल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडत आहे. या खड्ड्यात वाहने आदळून लहान-मोठे अपघात होत असून, वाहनांचेही नुकसान होत आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने प्रवास करणारे बाळसई, वांगणी आणि आमडोशी परिसरातील वाहनचालक, नागरिक व विद्यार्थी सध्या जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. येथील दुभाजक आणि लेन कटिंगच्या ठिकाणी वेग नियंत्रित करण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला रंबलिंग स्ट्रिप तसेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरधाव वाहनांचा वेग कमी करण्यासाठी वाहनचालकांना सावध करणारे सूचना फलक दोन्ही बाजूला लावणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
स्थानिक नागरिकांकडून वारंवार लक्ष वेधूनही महामार्गावरील या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने, आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कल्याण टोल प्लाझा एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत का? असा संतप्त सवाल वांगणी येथील सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र तेलंगे यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने तातडीने या खड्ड्यांची दुरुस्ती करून वाकण पुलापुढील वळणावर आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे. आवश्यक त्या उपायोजना न केल्यास वाकण पुलाच्या पुढील वळणावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही हरिश्चंद्र तेलंगे यांनी दिला आहे.
