नागरीकांच्या आरोग्याला धोका, वाकण -बाळसई मार्गावरील प्रकार
| सुकेळी । वार्ताहर ।
नागोठणे,वाकण, सुकेळी परिसरामध्ये भगारवाल्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वाकण -बाळसई मार्गावर वाकण पुलानजिक असलेल्या अनाधिकृत भंगाराच्या गोदामातून मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असल्यामुळे येथिल नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महामार्गावर नागोठणे ते कोलाड या दरम्यान हायवेलगत अनेक भंगारवाले ठाण मांडून बसले आहेत. यांच्यावर कोणाचीही दहशत राहिली नसल्यामुळे भंगारवाल्यांचे चांगळेच फावत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे महामार्गाजवळच वाकण -बाळसई रोडवरील वाकण पुलानजिक अंबा नदीच्या किनारी असलेल्या एका भंगाराच्या गोदामाजवळ मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या वस्तु, केबल अशा प्रकारच्या अनेक भंगारातील वस्तु जाळण्यात येतात. त्यामुळे अक्षरशः धुराचे लोटच्या लोट निघत असल्यामुळे सर्वच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदुषण दिसुन येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
त्यातच भंगाराचे गोदाम हे अंबा नदीच्या किनारी सुरू आहे. या सुरू असलेल्या भंगाराच्या गोदामाजवळुनच अंबा नदी वाहत आहे. या नदीच्या पाण्याचा वापर येथील नागरीक विविध कामांच्या वापरासाठी करित असतात. पंरतु या ठिकाणी असलेल्या भंगाराच्या गोदामातून खराब असलेला कचरा नदिच्या पाण्यात टाकत असल्याची शक्यता देखिल वर्तविण्यात येत आहे. खरं तर अशा महत्त्वाच्या ठिकाणी या भंगाराच्या गोदामांना धंदा करण्यासाठी परवानगी कशी मिळते ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या अशा अनाधिकृत असलेल्या भंगाराच्या गोदामांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.