पर्यटकांमधून नाराजीचा सूर
| माथेरान | प्रतिनिधी |
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना नेरळमार्गे घाटरस्ताच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. मात्र, हा नागमोडी आणि अवघड घाटरस्ता नवख्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. अरुंद वळणे आणि तीव्र चढ-उतार यामुळे समोरून वाहन आल्यास चालकांची गोंधळ उडते आणि अपघाताची शक्यता वाढते. अनेकदा वाहने रस्त्याच्या कडेला आदळण्याची किंवा खाली कोसळण्याची भीती निर्माण होते.
विशेषतः वॉटर पाईप रेल्वे स्टेशनखालील ‘पिटकर पॉईंट’ या वळणावर संरक्षणासाठी लोखंडी रेलिंग किंवा सिमेंटचा कठडा नसल्याने धोका अधिक वाढला आहे. या ठिकाणी यापूर्वीही अपघाताच्या घटना घडल्या असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पर्यटन हंगाम जवळ आला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवश्यक सुरक्षाव्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन गंभीर अपघाताची वाट पाहत आहे का, असा सवाल पर्यटक आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. घाटरस्त्याची एकूण स्थिती पूर्वीपेक्षा सुधारली असली तरी धोकादायक वळणांवर तातडीने संरक्षण भिंत किंवा रेलिंग उभारण्याची मागणी होत आहे.
माथेरान घाटरस्ता पूर्वीपेक्षा चांगला झाला आहे आणि दोन वाहने सहजपणे ये-जा करू शकतात. मात्र काही ठिकाणी तीव्र चढ-उतार आणि धोकादायक वळणांवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे. प्रशासनाने अशा ठिकाणी लवकरात लवकर रेलिंग किंवा संरक्षण भिंत उभारावी.
सचेत धुरी,
पर्यटक (मुंबई)







