देखभालीअभावी नागरिक त्रस्त
| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर सेक्टर 11 येथील नाना-नानी पार्कमध्ये रोज पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी कोणताही पहारेकरी नसल्यामुळे हे पाणी तासन्तास वाहत राहते. एकीकडे खारघरमधील नागरिक पाणीटंचाईच्या समस्येसाठी सिडकोकडे मोर्चे काढत असताना, दुसरीकडे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
पार्कमध्ये पहारेकरी नसल्यामुळे काही नागरिकांकडून झाडांच्या कळ्या व फांद्या तोडल्या जात असून, झाडांचे नुकसान होत आहे. दिवसाच्या वेळीही पहारेकरी असले तरी ते याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, रात्री पहारेकरी नसल्यामुळे येथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वाढली आहे. याशिवाय, बगीच्याबाहेर महापालिकेने उभारलेले सार्वजनिक शौचालय देखभालीअभावी अस्वच्छ अवस्थेत असून, परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे शेजारील सोसायटीतील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी ओव्हरफ्लो झालेल्या पाण्यामुळे शेजारच्या सोसायटीच्या गेटजवळ पाणी साचल्याचीही घटना घडली होती. या सर्व समस्यांकडे महापालिकेने तातडीने लक्ष देऊन रात्रीचा कायमस्वरूपी पहारेकरी नेमावा, तसेच दिवसा देखील कडक देखरेख ठेवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.







