| कोलाड | प्रतिनिधी |
कोलाड परिसरातील सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे संतोष येरूनकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत भावपूर्ण व उत्साहपूर्ण सन्मान सोहळा पार पडला.
रोहा-धाटाव औद्योगिक क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावणारे चिंचवली गावचे सुपुत्र संतोष रघुनाथ येरूनकर यांनी आपल्या सेवाकालाची यशस्वी सांगता करत सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या या सेवापूर्ती निमित्त कोलाड आंबेवाडी येथील श्री समर्थ नगरमध्ये मित्रपरिवाराच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. येरूनकर यांनी कलरकेम, क्लॅरिअंट, ह्युबाख आणि सध्या सुदर्शन युनिट-2 अशा विविध औद्योगिक संस्थांमध्ये दीर्घकाळ निष्ठेने काम केले. आपल्या कार्यकाळात त्यांनी कामगारांच्या हितासाठी कामगार संघटनेत नेतृत्व करत उल्लेखनीय कार्य केले. सुरक्षित कामाची जाणीव, जबाबदारीची भावना आणि सहकाऱ्यांशी जपलेला आपुलकीचा संबंध हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरले. कारखान्यातही त्यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचे व स्वभावाचे कौतुक करत गौरवोद्गार काढले. याप्रसंगी उपस्थित कुटुंबीय आणि मित्रमंडळींनाही विशेष समाधान वाटले. यानंतर श्री समर्थ नगर येथे आयोजित सोहळ्यात येरूनकर यांचा कुटुंबियांसह सत्कार करण्यात आला. मित्रपरिवाराने त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या सेवेला मानाचा मुजरा केला. हा भावनिक आणि उत्साही सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील, अशी भावना येरूनकर यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.







