| पोलादपूर | प्रतिनिधी |
शहरातील मंगलमूर्ती अपार्टमेंटच्या प्रांगणात सकल हिंदू समाज आयोजित सकल हिंदू संमेलनाप्रसंगी हिंदू ऐक्यासह विविध धर्मियांचे मूळ हिंदू धर्मातच असल्याने आता एकात्मता साध्य करण्याचे आवाहन व्यासपिठावरील वयोवृध्द वक्ते ह.भ.प. हरीभाऊ कंक महाराजांनी केले. याप्रसंगी सडवलीचे माजी सरपंच तथा शेकापक्षाचे तालुकाचिटणीस बापू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सकल हिंदू संमेलनामध्ये शुभांगी चिमणकर यांच्यासह मिलिंद कुलकर्णी तसेच पंकज बुटाला आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवू या, धरती-नभ-पाताळ ही भारू, प्राण पणाला लावू या या घोषवाक्याने एकात्मतेचा संदेश देत पोलादपूर विभागात सकल हिंदू संमेलनाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी पोलादपूर येथील मंगलमूर्ती पार्क येथे करण्यात आले. यावेळी समाजातील मतभेद व मनभेद दूर करून एकजूट मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सोशल मिडियावरून व्हायरल झालेल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुध्द आणि भारतमातेच्या प्रतिमांचा संदर्भ हिंदू एकात्मतेच्या संमेलनासाठी करण्यात आला असल्याने या सकल हिंदू संमेलनाला तालुक्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर उतेकर यांनी केले. समारोप वंदे मातरम् गीताच्या सामूहिक गायनाने करण्यात आला.







