नागोठण्यातील धोकादायक मोरीचे काम पूर्ण

वाहतूक लवकरच पूर्ववत करण्याचे बांधकाम खात्याचे संकेत
। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्यातील मुख्य रस्ता असलेल्या येथील शिवाजी चौक ते प्राथमिक आरोग्य केंद्र या अंतरातील विशाल मेडिकल समोरील मोरीचे रुंदीकरणासह नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे गेले काही दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला हा रस्ता आता पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रोहा उपविभागाचे शाखा अभियंता एम.एन. घाडगे यांनी दिली. तसेच सध्या पोलादी पाईपचे रेलिंग उभे केलेल्या दोन ठिकाणी कठड्यांचे बांधकामही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नागोठण्यात ये-जा करण्यासाठी असलेल्या या महत्वाच्या मुख्य रस्त्यावरील विशाल मेडिकल स्टोअरसमोर असलेल्या या मोरीच्या दोन्ही उद्ध्वस्त कठड्यांकडे व मोरीच्या नवीन बांधकामाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने गेल्या अनेक वर्षांपासून डोळेझाक केली होती. त्यामुळे या ठिकाणी गेल्या काही वर्षांत अनेक अपघात घडले होते. नागोठण्याला जोडणारे व याच मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रोहा विभागाकडून अनेकवेळा करण्यात आले, मात्र नागोठण्यातील या मुख्य रस्त्यावरील मोरीचे बांधकाम निधीअभावी रखडले होते.

तसेच या रस्त्याचे जेव्हा डांबरीकरण करण्यात आले तेव्हा या मोरीचा हा छोटासा कठडा नव्याने का बांधण्यात आला नाही? या कठड्याला एवढा किती खर्च झाला असता? असेही प्रश्‍न त्यावेळी नागरिकांतून उपस्थित झाले होते. त्यावेळी या मोरीच्या संरक्षक कठड्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. नवीन अंदाजपत्रकात शासनाकडून याला लवकरच मंजुरी मिळेल. त्यानंतर लगेचच हे काम करण्यात येईल असेही शाखा अभियंता एम.एन. घाडगे यांनी जून, 2019 मध्ये घेतलेल्या त्यांच्या प्रतिक्रियेत सांगितले होते. त्यानुसारच प्रस्ताव मंजूर झाल्याने मोरीचे हे काम पूर्णत्वास आल्याने नागरिक व वाहनचालकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version