। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्यातील मुख्य रस्त्यावर विशाल मेडिकलच्या समोरच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अनेक दिवसापासून सुरु असलेल्या एका छोट्या पुलाच्या कामात शासकीय अधिकार्यांनी व ठेकेदाराने पर्यायी वाहतुक व्यवस्थेचे कोणतेही नियोजन न केल्याने सर्वच वाहन चालकांची अडचण झाली होती, असे असतांनाच पुलाचे स्लॅबला अनेक दिवस झाल्याने किमान दुचाकी वाहनांना तरी पुलावरून जाण्याची सवलत मिळावी अशाप्रकारचे निवेदन सचिन मोदी यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला देत अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर हा पूल मंगळवारपासून दुचाकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या पुलाचे काम सुमारे दिड महिन्यापूर्वी सुरु करण्यात आले होते. तेव्हापासून वाहनचालक व नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. नागोठणे एसटी स्टँड जवळील विशाल मेडिकल समोर हे काम सुरु होते. हा नागोठ्यातील मुख्य रस्ता असून याच ठिकाणावरून नागोठण्यामध्ये एसटी बसची ये-जा असते तसेच याच रस्त्यावरून नागोठण्यासह विभागातील नागरिक तलाठी कार्यालय, पेट्रोल पंप, बँक, सरकारी दवाखाना येथे सतत ये-जा करत असतात. त्यामुळे वर्दळीचा रस्ता आहे हे माहित असूनही संबंधित खात्याच्या लोकांनी सदर पूलाचे काम करताना पर्यायी रस्ता न बनवता केवळ छोटा पूल निर्माण करून पायी चालणार्यांना तात्पुरती वाट निर्माण करून हा रस्ता हा खूप दिवसांपासून बंद ठेवला होता. तसेच नागरिकांना नागोठणे हायवे नाक्यावर जाण्यासाठी खूप दुरून गावाला वळसा मारून जावे लागत होते. त्यामुळे कमीतकमी दुचाकी वाहनांना तरी पर्यायी रस्ता करून द्यावा अशी विनंती केली होती. त्यानुसार दुचाकींची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.