। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत शहरातील डेक्कन जिमखाना भागातील एका इमारतीमध्ये एका चोवीस वर्षांच्या युवकाचा चाकूने भोसकून व एका रॉडच्या साहाय्याने मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला. हा खून आपापसातील वादातून झाला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील वांजळे गावात राहणारा समीर महेंद्र ठाकरे (24 वर्षे) आणि पुलाचीवाडी येथे राहणारा चेतन संभाजी भोईर (21 वर्षे) या दोघांमध्ये दि.14 जून रोजी रात्रीच्या सुमारास वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. चेतनने समीरच्या चाकूने वार केले. तसेच लोखंडी रोडने त्याला मारहाण केली. या मारहाणीत समीर गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. ही घटना डेक्कन जिमखाना भागातील मधू मालती इमारतीच्या एका ब्लॉकमध्ये काल रात्री सातच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती बुधवारी सकाळी सातच्या सुमारास समीरचा भाऊ परेश ठाकरे यांने कर्जत पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार रीतसर गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक संदीपान सोनवणे अधिक तपास करीत आहेत.