| पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील घोटवडे येथील अंबा नदी पूल जीर्ण व धोकादायक झाला आहे. घोटवडे व इतर गाव तसेच आदिवासी वाड्यावस्त्यांना जोडणाऱ्या वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला या पुलावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे चिंता वाढली आहे. शेजारीच सुरु असलेल्या नव्या पुलाचे बांधकाम मात्र खोळंबले आहे. त्यामुळे नवीन पूल वाहतुकीस सुरु होईपर्यंत ग्रामस्थ व वाहनांना सध्या या जीर्ण पुलावरूनच धोकादायकपणे प्रवास करावा लागत आहे. रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 45 मीटर लांबी व 5 मीटर रुंदीच्या घोटवडे पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग पाली सुधागडच्या माध्यमातून सन 1991 साली करण्यात आले होते. तालुक्यातील इतर गावांना व आदिवासीवाड्यांना जोडणारा हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मात्र, हा पूल अखेरची घटका मोजताना दिसत आहे.
घोटवडे पुलावरून धोकादायक प्रवास
