इमारत मालकांना नगरपरिषदेकडून नोटीसा
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड शहरात 20 इमारती धोकादायक आहेत. यातील सहा इमारतींमध्ये आजही लोक वास्तव्यास आहेत. दरम्यान, या इमारतींच्या मालकांना मुरुड-जंजिरा नगरपरिषद प्रशासकाकडून नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐन पावसाळ्यात ऐरणीवर आला आहे.
धोकादायक जुन्या इमारतींना पावसाळ्यात अधिक धोका असतो. तरी सदर मालकांनी आपल्या मालकीची असणारी धोकादायक इमारत किंवा मोडकळीस आलेला भाग काढून टाकावा व जीवितहानी टाळावी, असे आवाहन नगरपरिषदकडून करण्यात आले आहे. जर तसे नाही केल्यास आणि इमारत किंवा इमारतीचा भाग पडला आणि रस्त्यावरून येणार्या कुठल्याही नागरिकांस व स्वतःला लागून जीवितास हानी झाली तर सर्वस्वी तुम्ही जबाबदार असणार, अशी नोटीस प्रशासकाकडून शहरातील 20 धोकादायक इमारत मालकांना देण्यात आली आहे.
दरम्यान, नगरपालिकेकडून शहरांमधील बाजारपेठ शाळा नंबर 1 जवळील -रमाकांत सुंदर धोत्रे, गावदेवी पाखाडी येथील- भागीर्थीबाई गणपत साखरकर, बाजारपेठ येथील मे.परस्पर सहकारी पतपेढी- दिलीप बागडे, मारुती नाका येथील प्रवीण दामोदर चोरघे, गोडेकर गल्ली बाजारपेठ येथील दिपक वामन भायदे, एकदा ब्रिजसमोरील मे. अधीक्षक कस्टम ऑफिस, कासार आळी येथील गिरीश रामभाऊ पाटील, बैलपुडा येथील पांडुरंग नारायण दोडकुलकर, भंडारवाडा येथील वीणा रत्नाकर पिळणकर, भंडारवाडा येथील हरिश्चंद्र पांडुरंग सातांबेकर, बाजारपेठ येथील सचिन दत्तात्रेय कासेकर, बाजारपेठ येथील मोहनलाल चुनीलाल जैन व इतर, गोडेकर गल्ली बाजारपेठ येथील गजानन रामचंद्र नागवेकर, गावदेवी पाखाडी येथील काजी सत्तार तर्फे बाबासाहेब कोटक, बाजारपेठ येथील प्रमिला जनार्दन करडे व शुभांगी राजेंद्र करडे, शेगवाडा येथील पुष्पलता जनार्धन माळी व निर्मला रामचंद्र चौलकर, जुनी पेठ येथील अनिल इस्माईल कादिरी, बाजारपेठ येथील सिसिल सुनील भायदे व शांतरनाथ भगवान जैन, दरबार रोड येथील कमल टॉकीज- एन.एन. ऐनन व आर.जी.मेनन या संबंधिताना नोटीस देण्यात आल्या आहेत.