ग्रामस्थांनी भरले धोकादायक खड्डे

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे तात्काळ भरा, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या होत्या. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करणार्‍या ठेकेदार कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे चाकरमान्यांचे आगमन खड्ड्यातूनच झाले. संगमेश्‍वर येथील सोनवी पूलाला पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे या पुलावरुन एकेरी वाहतूक सुरु होती. खड्ड्यांमुळे पूलाची झालेली दुरवस्था पाहून संगमेश्‍वर येथील रामपेठ मापारी मोहल्ला येथील युवकांनी एकत्र येत सोनवी पुलावरील खड्डे भरुन सामाजिक बांधिलकीचा आदर्श जोपासला आहे. या कृतीतून ग्रामस्थांनी एकतेचेही दर्शन घडवले. सोनवी पूल हा ब्रिटिश कालीन आहे. 1937 मध्ये उभारलेला हा पूल धोकादायक बनला आहे. मात्र अनेक ठिकाणी तडे गेले आहेत तसेच वाहने जाताना हलणारा पूल धोकादायक नसल्याचे बांधकाम विभागातर्फे सांगितले जात आहे. पुलावरील जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे पूल अधिकाधिक धोकादायक बनत असताना ठेकेदार कंपनी अथवा बांधकाम विभागाचे अधिकारी खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष करीत होते. याचा वाहनचालक तसेच पादचार्‍यांना त्रास सहन करावा लागत होता. सोनवी पुलावरील सर्व खड्डे भरुन सामाजिक बांधिलकीचे आणि हिंदू मुस्लिम एकतेचे सुंदर दर्शन घडवले. रामपेठ आणि मापारी मोहल्ला येथील हिंदू मुस्लिम युवकांच्या या संवेदनशील कृतीबद्दल आ. शेखर निकम यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version