विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक

नियमाबाह्य वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही जिवघेणी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अद्याप कोणतही कारवाई होताना दिसत नाही. विद्यार्थी सुरक्षिततेबाबत केवळ आरडाओरड करणाऱ्या शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मात्र बेजबाबदार असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर घरी सोडण्याच्या नादात स्कूल वाहनचालक नियमांचे धिंडवडे काढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नियमांपेक्षा जास्त संख्येत विद्यार्थी व्हॅनमध्ये कोंबले जातात, तसेच हे व्हॅन चालक रेड सिग्नलची तमादेखील बाळगत नसल्याने भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. धोकादायक विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या वल्गना प्रादेशिक परिवहन विभागाकडून दरवर्षी केल्या जातात. अनेकदा इशारेही दिले जातात. मात्र, अशी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात हात आखडताच घेतल्याचे चित्र शहरात दिसते. फिटनेस सर्टिफिकेट्स नसलेल्या स्कूल बसेसमधून दहा ते पंधरा विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक आजही शहरात बिनबोभाट सुरू असल्याचे दिसते. प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईबाबत मात्र डोळ्यावर पट्टी ओढली आहे. शहरातील अनेक शाळांमध्ये स्कुल व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूक होते. अनेक शाळांमध्ये स्कूल बस व व्हॅनची सुविधा पुरवली जात असली तरी काही शाळांत रिक्षाने विद्यार्थी वाहतूक केली जाते. लहान मुले तक्रार करत नाहीत. शिवाय, नोकरदार पालकांना मुलांना शाळेत सोडायला आणि आणायला वेळ नसतो. त्यामुळे अशी वाहतूक करणाऱ्यांविरोधात मुलांना त्रास होत असला तरी पालक गप्प बसणे पसंत करतात. सहा सीटर रिक्षात तर 20 ते 25 मुले कोंबली जातात.

पालकांची बेपर्वाई ठरतेय धोकादायक
नोकरी, व्यवसायामुळे पालकांना मुलांना वेळेत शाळेत पोहोचवितायेत नाही. त्यामुळे वाहतूक सुविधेचा पर्याय स्वीकारला जातो. परंतु, आपला पाल्य शाळेत कसा जातो, याबाबत पालकांनी जागरुक राहणे गरजेचे आहे. ज्या वाहनातून विद्यार्थी शाळेत जातो, त्यात किती विद्यार्थी बसविले जातात, चालकाचे वर्तन आदींची माहिती पालकांनी घ्यावी.
वाहनांच्या वेगावर नियंत्रण हवे
अनेकदा या वाहनांचा वेग जास्त असतो. परिणामी, अपघाताचीही शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण असायला हवे.
Exit mobile version