दानियाल चोगले कोकणातील पहिला एअरक्राफ्ट इंजिनियर
। धाटाव । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा अल्पसंख्याक विकास मंच आणि रोहा एज्यु. अँड वेल्फ. असोसिएशन या संस्थेचे उपाध्यक्ष सलीम चोगले यांचे चिरंजीव दानियाल चोगले याने वैमानिक क्षेत्रात गरुडझेप घेत रोह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. अवघ्या 27 व्या वर्षी त्याने एव्हीएशन क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश मिळविले असून, ए 320 ते एटीआर या दोन्ही विमानांवर अधिकृत स्वाक्षरीचे अधिकारी मिळविणारा कोकणातील पहिला एअरक्राफ्ट इंजिनियर ठरला आहे. तरुण वयात वैमानिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतल्याबद्दल दानियालवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दानियाल चोगले याने नर्सरीपासून इयत्ता 12 वीपर्यंत रोह्यातील जे.एम. राठी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. बालपणापासून वैमानिक क्षेत्राची आवड असणाऱ्या दानियालने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले. त्या ठिकाणी हिंदुस्थान एरोस्पेस अँड इंजिनिअरिंग कॉलेजमधून एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याचा व्यावसायिक प्रवास विस्तारा एअरलाईन्स या कंपनीतून सुरु झाला. या ठिकाणी साडेतीन वर्षे सेवा दिल्यानंतर अनुभवाच्या जोरावर तो नावाजलेल्या इंडिगो एअरलाईन्स या कंपनीच्या सेवेत रुजू झाला. या ठिकाणी नोकरी करीत असताना त्यांनी ॲडवान्सड एअरबस ए 320 आणि एटीआर 72 विमाननांवर तांत्रिक जबाबदारी संभाळत आहे. दानियालने वैमानिक क्षेत्रात घेतलेली गरुड झेप तरुणांसाठी एक प्रेरणा असून, मोठे स्वप्न उराशी बाळगून व ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली तर यश नक्कीच मिळते, हे त्याने सिद्ध करुन दाखवले आहे. दानियालच्या यशस्वी कामगिरीने रोह्याचे नाव देशपातळीवर पोहोचले आहे. याबद्दल त्याचे सर्व समाजातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
मी रोह्यासारख्या छोट्याशा गावात जन्म घेतला असून, जिथे विमान फक्त आकाशातून दिसते. माझे वडील सलीम, आई तबस्सूम, बहीण मेहवीश यांनी केलेले सहकार्य आणि रोहेकर जनतेच्या आशीर्वादामुळे मी आतापर्यंत मजल मारली आहे. सर्वांनी दिलेली साथ माझ्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि काम करण्यासाठी नवीन उमेद देत असते.
दानियाल चोगले