शिधापत्रिकाधारकांची रेशन दुकानांमध्ये गर्दी
| चिपळूण | प्रतिनिधी |
सध्या चिपळूण येथील रास्त धान्य दुकानांमधून जूनसह जुलै व ऑगष्ट असे तीन महिन्याचे धान्य एकदाच मिळत आहे. एकाचवेळी धान्य पॉस मशिनवर वाटपाला उपलब्ध करून देण्याची जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक, मालक संघटनेची मागणी जिल्हा पुरवठा विभागाने पूर्ण केली. त्यामुळे धान्य वाटपाचा मार्ग सुकर झाला आहे. यामुळे शिधापत्रिकाधारकही खुश आहेत. मात्र, थकीत कमिशन अद्याप न मिळाल्याने दुकानदार नाराज आहेत.
पावसाचा वाढता जोर, पूर येण्याची शक्यता अशा अनेक कारणांमुळे धान्य खराब होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेता तसे होऊ नये म्हणून यावर्षी जून महिन्यातच पुढील दोन अशा तीन महिन्याचे धान्य एकदाच वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, तीन महिन्याचे धान्य दुकानात ठेवण्यास जागा अपुरी आहे. एक-दोन महिन्यासाठी जवळपास जागा भाड्याने घेणे दुकानदारांना परवडणारे नाही. त्यामुळे दुकानदारांना टप्या-टप्याने धान्य पुरवठा व्हावा व जूनचे धान्य वाटपाबरोबरच जुलै व ऑगस्टचे धान्य पॉस मशिनवर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संघटनेने पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांच्याकडे केली होती. त्यानुसार या दोन्ही मागण्या मान्य झाल्याने उपलब्ध धान्यानुसार तीन महिन्याचे धान्य शिधापत्रिकाधारकांना दिले जात आहे.
तसेच, सध्या पाऊस कमी असल्याने व एकदाच तीन महिन्याचे धान्य मिळत असल्याने शिधापत्रिकाधारक रेशन दुकानांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दुकानदारांना धान्य वाटपाचे कमिशन मिळालेले नाही. तरीही एकाचवेळी तीन महिन्याची धान्य वाटपाची जबाबदारी त्यांनी विनातक्रार घेतली आहे. सध्या शेतीचा हंगाम आहे. त्यातच मुलांच्या शाळाही सुरू होणार आहेत. त्यामुळे हा खर्च कोठून करावा असा प्रश्न बहुतांशी दुकानदारांना पडला आहे. त्यामुळे शासनाने थकीत कमिशन तातडीने दुकानदारांच्या खात्यात जमा करावे.
अशोक कदम,
अध्यक्ष- जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक, मालक संघटना