| खोपोली | प्रतिनिधी |
ढेकू-आडोशी रस्त्याच्या बाजूनेच कंपन्यांसाठी भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यात आली आहे. 22 हजार उच्च दाबाची विद्युत केबल रस्त्याच्या बाजूला वरच्यावरच टाकली जात असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची परिस्थिती झाली आहे. त्याबाबतची ओरड मनसेचे कार्यकर्ते गेल्या दोन महिन्यांपासून करीत आहे. त्यातच पातळगंगा विद्यालयासमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण उमेश गावंड हे करीत आहेत. रविवार (दि.9) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला लोखंडी फळी लावण्यासाठी सलई ठोकत असताना अर्ध्या फुटावर असलेल्या विद्युतवाहीनीत घूसली आणि कामगाराला शॉक लागून रस्त्यावर उडाला गेला. सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. या घटनेची माहिती मिळताच मनसेचे शाखा अध्यक्ष शुभम पाटील, पंचायत समिती विभाग अध्यक्ष अक्षय खेडेकर घटनास्थळी पोहचले. गेल्या दोन महिन्यापासून तळमळ व्यक्त करीत विद्युत जोडण्यासाठी विरोध केला आहे. त्यामुळे महावितरण अधिकारी, ठेकेदारावर, कंपनी व्यवस्थापकांचा हलगर्जीपणा समोर आला असून मनसेसैनिक पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी नियमानुसारच भूमिगत विद्युत वाहिणी टाका, अन्यथा मनसेस्टाईलने खळखट्याक केला जाईल, असा इशारा दिला आहे.