| पनवेल | वार्ताहर |
कळंबोली सर्कल ते पनवेल शहराकडे जाणार्या मुख्य महामार्गालगत असणार्या आसूड गाव ते खांदा कॉलनी या रस्त्याच्या दुतर्फा महानगरपालिकेच्या प्रयत्नांतून विजेचे खांब उभारण्यात आले होते. काही दिवस हे विजेचे खांब सुस्थितीत होते. मात्र, या ठिकाणी केंद्र सरकारच्या सुरू असलेला रस्त्याच्या कामामुळे हे विजेचे खांब नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर संध्याकाळनंतर अंधार पसरत आहे. अंधारामुळे या मार्गावर अपघात होत असल्याने येथील नागरिकांसह प्रवासी व वाहनचालक नाराजी व्यक्त करू लागले आहेत.
येथील नागरिकांनी पनवेल महानगरपालिकेकडे वारंवार केलेल्या मागण्यांनंतर त्यांनी नुकताच या रस्त्याच्या दुतर्फा विद्युत खांब उभारले होते. त्यामुळे हा भाग रात्रीच्या वेळी लख्ख प्रकाशाने उजळून निघत होता. त्यामुळे वाहतूकदारांना तसेच नागरिकांना येथून ये-जा करताना दिलासा मिळत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या विद्युत खांबावरील दिवे बंद असल्याने येथून ये-जा करताना नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगत संबंधित प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन या रस्त्यावरील दिवे सुरू करावेत, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.