। उरण । प्रतिनिधी ।
बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी नोडमध्ये साफसफाई कामगार भरतीमध्ये दिव्यांगाना प्राधान्य मिळावे. तसेच, गावातील कमिटीमध्ये किमान एक दिव्यांग बांधवांचा समावेश करून घ्यावे, या प्रमुख मागणींसाठी येथील दिव्यांग बांधव मंगळवारी (दि.25) बोकडविरा ग्रामपंचायतीत धरणे आंदोलनाला बसणार होते. मात्र, धरणे आंदोलनाला बसण्यापूर्वीच बोकडविराचे सरपंच अपर्णा पाटील, उपसरपंच ध्रुव पाटील, ग्रामसेवक घाडगे, कॉम्रेड भूषण पाटील, रामचंद्र म्हात्रे, यशवंत ठाकूर, हेमलता पाटील, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी समीर ठाकूर, रणिता ठाकूर, उमेश पाटील, राजेंद्र पाटील यांच्यात महत्वाची बैठक संपन्न झाली. दिव्यांग बांधवाचे प्रतिनिधी म्हणून दिव्यांग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र नामदेव म्हात्रे यांनी नेतृत्व केले. या बैठकीत दिव्यांग बांधवांच्या महत्वाच्या मागण्यावर सकारात्मक चर्चा झाली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी दिव्यांग बांधवाना त्यांचे मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आश्वासन मिळाल्याने दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त करत जाहीर केलेले आमरण उपोषण स्थगित केले.