निवृत्ती म्हणजे नव्या पर्वाची सुरुवात: चित्रलेखा पाटील

दत्तात्रेय ठाकूर यांचा सेवापूर्ती सोहळा

| अलिबाग | प्रतिनिधी |

सेवापूर्ती सोहळ्याचा हा क्षण म्हणजे आनंद आणि भावनांचा संगम. अनेक वर्षे आपण शिक्षण क्षेत्रात निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पणाने कार्य केले. आपल्या मार्गदर्शनामुळे या विभागातील असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन उजळले, त्यांना योग्य दिशा मिळाली. आपण या शाळेत फक्त मुख्याध्यापक नव्हता, तर एक मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि आदर्श व्यक्तिमत्त्व होता. आपल्या कार्याचा ठसा प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशात दिसून आला. निवृत्त होणे म्हणजे शेवट नाही, तर आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे, असे प्रतिपादन पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी केले.

पीएनपी काचळी-कुसुंबळे या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय ठाकूर यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, दत्तात्रेय ठाकूर हे 33 वर्ष प्रदीर्घ सेवा करून पीएनपी काचळी-कुसुंबळे या शाळेच्या मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधान लाभो ही सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. पुढे मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, गरजू व ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देणे हीच खरी समाजसेवा आहे. शिक्षणामुळेच त्यांच्या आयुष्यात बदल घडू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याने शिकले पाहिजे, हा ध्यास घेतल्यास आपण एक सशक्त आणि प्रगत समाज घडवू शकतो. हे मनाशी बाळगून रायगडचे भाग्यविधाते भाऊ प्रभाकर पाटील यांचे शिक्षण संस्था सुरू करण्याचे स्वप्न भाई जयंत पाटील यांनी पाहिले आणि पीएनपीच्या खेडोपाड्यात मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा, कॉलेज सुरू करून शैक्षणिक जाळे उभे केले. या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शिकून स्वतःच्या पायावर उभी राहिलीत याचा अभिमान वाटतो. पीएनपी संस्थेचे माजी कार्यवाह दि. रा. फुलगावकर यांचे स्मरण संस्थेला कायम राहील. संथेच्या जडणघडणीत त्यांचे सुद्धा मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी नेमणूक केलेले मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संस्थेसोबत कायम जोडून राहिले आहेत आणि शैक्षणिक दृष्ट्या संस्थेचा नावलौकिक वाढवत आहेत याचा अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले. तसेच, शाळा समिती आणि पीएनपी संस्थेच्यावतीने चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संस्थेतील पदाधिकाऱ्यांचे देखील चित्रलेखा पाटील यांनी कौतुक केले.
यावेळी संस्थेच्या वतीने दत्तात्रेय ठाकूर यांना संस्थेचे मानपत्र, पुष्पगुच्छ, मायेची शाल तसेच त्यांच्या पत्नी वैशाली ठाकूर यांना मायेची शाल आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शाळा समिती सदस्य मच्छिंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते हेमनाथ खरसंबळे, काचली केंद्र प्रमुख सुविधा पाटील, ना.ना. पाटील हायस्कूल पोयनाडचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील, संस्थेच्यावतीने हिरेन राठोड, विक्रांत वार्डे, अमोल नाईक, मनिषा रेलकर, दिनेश पाटील, पीएनपीच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक, शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि ठाकूर यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

Exit mobile version