। पनवेल । प्रतिनिधी ।
खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अंदाजे 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृताची ओळख अद्याप पटलेली नसल्याने त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी कामोठे पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
31ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 8 वाजता हनुमान मंदिरासमोर, खांदा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच बीट मार्शल पोलीस हवालदार माने आणि पोलीस शिपाई दीपक बाबासाहेब बवदे यांनी त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे दाखल केले. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी अज्ञात आजारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे 50 वर्षे, उंची सुमारे 5 फूट 6 इंच, रंग सावळा, केस काळे-पांढरे, नाक सरळ, चेहरा उभट, मिशी काळी व दाढी पांढरी आहे. या वर्णनातील व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकांची माहिती असल्यास पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश घागरे, मो. 9168457709 किंवा कामोठे पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश घागरे करीत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ आढळला मृतदेह
