अंत्यविधी उरकल्याने नातेवाईकांना मिळाली फक्त राख
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
उपजिल्हा रुग्णालयात घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शवागरात ठेवण्यात आलेला मृतदेह दुसऱ्याच नातेवाईकांना देण्यात आल्याने अंत्यविधी पार पडलेल्या व्यक्तीची राख नातेवाईकांना मिळाली आहे. घडलेल्या या प्रकारामुळे मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
यापूर्वी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात मृतदेहाच्या अदलाबदलीचा प्रकार घडला होता. नावातील साधर्म्यामुळे हा प्रकार घडला होता. मृताच्या नातेवाईकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने अदलाबदली झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते. उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेत मात्र बदली झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पडले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत मल्ला या नेपाळी व्यक्तीचे दुर्दैवी निधन झाले. नेपाळमधील त्याचे नातेवाईक शव घेण्यासाठी यायला उशीर लागणार असल्याने त्यांचे पार्थिव पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयातील शवागरात ठेवण्यात आले होते. त्याच वेळी दुसऱ्या एका नेपाळमधील नागरिकाचे शवदेखील शवागरात ठेवण्यात आले होते. मात्र, त्या व्यक्तीच्या नातेवाईकांच्या हवाली सुशांत यांचे शव करण्यात आल्याने त्यांच्याकडून अनावधनाने सुशांत यांच्यावर अंत्यसंकार करण्यात आले. जेव्हा मल्ला यांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले, तेव्हा त्यांना मृतदेह मिळालाच नाही.
रुग्णालय प्रशासनाकडून शोध घेतल्यानंतर असे स्पष्ट झाले की, सुशांत मल्ला यांचा मृतदेह चुकीच्या ओळखीतून दुसऱ्या नेपाळी कुटुंबाला देण्यात आला होता, आणि त्या कुटुंबाने त्या मृतदेहाचे अंत्यसंस्कारही पूर्ण केले होते. या घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, या गंभीर चुकीची अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, सुशांत मल्ला यांच्या खऱ्या नातेवाईकांनी मोठी धावपळ करून संपूर्ण घटना तपासली. मात्र, त्यांना आपल्या प्रिय व्यक्तीचा मृतदेह परत मिळू शकला नाही. अखेरीस त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अंत्यसंस्कारानंतरची राख गोळा करून आणली.
हा प्रकार अत्यंत निंदनीय ठरत आहे. कारण, साधारणतः मृत व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यापूर्वी शवागरात पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत कागदपत्रांची पडताळणी करून ओळख पटवली जाते. या सर्व प्रक्रियेचे उद्दिष्टच सुरक्षितता आणि अचूकता राखणे असते. मात्र, या प्रकरणात ती यंत्रणा पूर्णतः फेल ठरल्याचे आणि प्रशासनाच्या निष्काळजी कामगिरीचे तीनतेरा वाजल्याचे चित्र समोर आले आहे.
या अमानवी व निष्काळजी प्रकारामुळे पनवेल परिसरात तसेच नेपाळी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून, संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.







