। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड समुद्रकिनारी एक मोठा डॉल्फिन जातीचा मासा आढळून आला आहे. वन्यजीव प्रेमी संदीप घरत यांना माहिती मिळताच तात्काळ वन अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तातडीने वन कर्मचारी मुरुड समुद्रकिनारी पोहचले. मुरुडमधील नवाब कालीन कमल टॉकीजच्या पाठीमागील बाजूस हा मृत डॉल्फिन आढळून आला. या डॉल्फिनचे परीक्षण केले असता डॉल्फिनचा दोन दिवस अगोदरच मृत्यू झाला असून तो समुद्राच्या पाण्यावर वाहत येऊन मुरुड समुद्रकिनारी आला आहे. यावेळी डॉल्फिनचे वजन केले असता सुमारे 80 किलो असून त्याची लांबी 2.24 मीटर तर आकाराने त्याची गोलाई 170 सेंटीमीटर आढळून आली. मुरुड नगरपरिषदेच्या जेसीबीच्या साह्याने मोठा खड्डा करून त्याला पुरण्यात आले. डॉल्फिनचा मृत्यू मोठ्या जहाजाचा पंखा लागल्याने झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मुरुड समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन
