। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड, एकदरा, राजपुरी, आगरदांडा तसेच श्रीवर्धन-दिघी समुद्रकिनारी मृत कासवे व डॉल्फिन मासे आढळून येण्याच्या प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या प्रकाराने प्राणी मित्रांकडून हळहळ व चिंता व्यक्त केली जात असून यावर योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे नुकतेच मुरुडच्या समुद्रकिनारी ग्रीन टर्टल जातीचे मृत कासव वाहून आले होते. त्या कासवाचा मृत्यू जहाजांच्या धडकेने किंवा पंख्यात अडकून झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, मृत कासवाला कावळा-कुत्र्यांपासून वाचावे तसेच आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन, आजुबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरु नये म्हणून येथील सर्पमित्र व प्राणीमित्र संदीप घरत यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे व वनपाल संतोष रेवणे यांच्या सहकार्याने समुद्रकिनारी खड्डा करून त्या मृत कासवाला दफन केले. त्यामुळे, समुद्रकिनारी मोठमोठे कासव व डॉल्फिन मासे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडत असून अशावेळी आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित नगरपालिका व वनखात्याने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, असे मत सर्पमित्र संदीप घरत यांनी व्यक्त केले आहे.