। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
खालापूर तहसील कार्यालयात अनेक नागरिकांना आपल्या संबंधित खटल्यांचा निकाल प्राप्त करण्यासाठी असंख्य फेर्या माराव्या लागतात. परंतु, आता या फेर्यांना पूर्णविराम मिळणार असून, तहसीलदार अभय चव्हाण यांनी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवली आहे. नागरिकांना आता महसुली अर्धन्यायिक निकाल क्यू आर कोडद्वारे घरबसल्या मिळणार असल्याने तहसीलदार अभय चव्हाण यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, अॅड.जयेश तावडे यांनी खालापूर तहसील कार्यालयाला भेट देऊन क्यू आर कोडबाबत माहिती घेतली. त्यावेळी क्यू आर कोड कसा स्कॅन करावा याबाबत महसूल सहायक सारंग राठोड यांनी संपूर्णपणे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अर्धन्यायिक प्रकरणात दिला जाणार्या निकालाची समज या प्रतीचा क्यूआर कोड दिला जाणार आहे. हा कोड अर्जदार व सामनेवाला तसेच हित संबंधित व्यक्तींनी आपल्या मोबाईल वरील गुगल लेन्स द्वारे स्कॅन करावा. हा कोड स्कॅन केल्यानंतर निकालाच्या सहीची प्रत पाहता येणार असून, ही प्रत डाऊनलोड करता येणार आहे. तसेच, इतरांना देखील पाठवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे खालापूर तहसीलदारांचा हा स्तुत्य उपक्रम वाखाण्याजोगा असल्याची प्रतिक्रिया अॅड.जयेश तावडे यांनी व नागरिकांनी व्यक्त केली आहे.