मुंबईच्या बाणगंगा टाकीत मृत मासे

। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबईच्या वाळकेश्‍वर मंदिर परिसरातील बाणगंगा टाकीमध्ये हजारो मृत मासे तरंगताना आढळले आहेत. स्थानिक रहिवाशांच्या मते, दरवर्षी पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी टाक्यांमध्ये असे मृत मासे आढळतात. या 15 दिवसांच्या विधीमध्ये विविध पदार्थ अर्पण करून लोक त्यांच्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहतात. मात्र, या पदार्थांमुळे आणि त्यातून होणार्‍या प्रदूषणामुळे दरवर्षी असे हजारो मासे मृत पावतात. टाकीतील पाणी स्थिर असल्याने ऑक्सिजन त्वरीत कमी होतो आणि मोठ्या प्रमाणात मासे मरतात.


मुंबईच्या बाणगंगा टँकच्या मालकीची असलेली गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्ट ही पितृपक्षातील शेवटच्या दिवसानंतर दर दिवशी टाकीतून एक टन मृत मासे साफ करते. वर्षानुवर्षे बृहन्मुंबई महानगरपालिकेने माशांचे संरक्षण करण्यासाठी पाणी स्वच्छ करणे, घाण पाणी बाहेर काढून टाकणे, टाक्या स्वच्छ करण्यासाठी लोकांना तैनात करणे आणि निर्माल्य पाण्यात न टाकता ते जमा करण्यासाठी जागोजागी निर्माल्य कलश ठेवणे यांसारख्या अनेक उपाययोजना केल्या आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून लोकांना फलक लावून देखील याबाबतच्या सूचना केल्या जात आहेत. मात्र, या नियमांचे अगदी क्वचितच पालन होताना दिसते. परिणामी, जलप्रदूषणासारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

Exit mobile version