मुंबई- गोवा महामार्गाच्या डागडुजीसाठी 15 ऑगस्टची डेडलाईन

अन्यथा करणार चक्काजाम; रायगड जिल्हा महाराष्ट्र वाहतूक सेनेचा इशारा

| महाड | वार्ताहर |

तब्बल 30 दिवसांवर कोकणातील गणेशोत्सव येऊन ठेपला असताना देखील रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचे विघ्न संपण्याचे नाव घेत नाही. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था या महामार्गाची झाली असून, रायगड जिल्ह्यात निवडून येणारे सर्वच आमदार व खासदार सत्ताधारी राज्य व केंद्र सरकारमधील प्रतिनिधित्व करीत असताना यंदा देखील चाकरमान्यांना वाहतूक कोंडी व खड्ड्यातूनच रायगड जिल्ह्यातील टप्पा पार पाडावा लागणार आहे. सत्तेत असणारे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसलेत असा आरोप कोकणकर जनता करीत आहे. मुंबई- गोवा महामार्गाची 15 ऑगस्टपर्यंत तातडीने दुरुस्ती न केल्यास चक्काजाम करण्याचा इशारा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला आहे.

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या कामाला तब्बल 18 वर्ष झाली. मात्र, तरी देखील या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण होण्याचे नाव घेत नाही रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी झाली आहे. पेण ते नागोठणे या पट्ट्यात अनेक ठिकाणी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे.

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून, मागील 17 वर्ष या कोकणातील जनतेला. या महामार्गावरून खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला आहे. तशीच अवस्था अठराव्या वर्षी देखील कोकणातील जनतेवर येऊ नये यासाठी 15 ऑगस्ट पूर्वी या महामार्गावरील पडलेले खड्डे सुस्थितीत करून रस्ता पूर्ववत करा. तसेच या महामार्गावरून जाणारे रायगड जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील सर्वच लोकप्रतिनिधी सरकार दरबारी आवाज उठवण्यात अपयशी ठरले आहेत का? असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी केला आहे. या महामार्गावर अठरा वर्षात अपघातात निष्पापांचे बळी गेले आहेत व जे अपघातग्रस्त कायमस्वरूपी जायबंदी झाली आहेत, त्या कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुभाष मोरे यांनी केली आहे.

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वासाठी मागील वर्षी जनआक्रोश समितीने 6 दिवस रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे उपोषण केले. मात्र, त्या वेळेला तत्कालीन रायगड वर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषण स्थळी चर्चेला न येता हवाई मार्गाने पलायन केल्याचे रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी पाहिले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी महाडचे आमदार गोगावले यांनी भ्रमणध्वनीद्वारे सात मिनिटे चर्चा करून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, मुख्यमंत्रीपद गेले व आश्वासन हवेत विरले अशी म्हणण्याची वेळ आता कोकणकर जनतेवर आली आहे. कोकणातील गणेशोत्सव जवळ आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पळस्पे फाटा येथून मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यास सुरुवात केली व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे भरण्यास सांगितले.

कोकणातील गणेशोत्सव सण चालू होण्यास केवळ 30 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. मात्र, आठ दिवस अगोदरच कोकणात राहणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाहण्यास मिळते. मागील वर्षी ज्या ठिकाणी खड्डे पडले होते, त्याच ठिकाणी यावर्षी देखील खड्डे पडले आहेत. मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव, इंदापूर, लोणेरे व कोलाड तसेच नागोठणे या ठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे व रस्त्याची अर्धवट अवस्थेत असलेली कामे यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होणार आहे. माणगाव व इंदापूर या दोन गावांमधून जाणारा रस्ता हा अरुंद असल्याने वाहतूक कोंडीचा सामना नित्य नियमाने स्थानिक जनतेला भेडसावत आहे.

काम पूर्ण होण्या अगोदरच टोल नाके सज्ज
मुंबई व राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील सुकेळी खिंड व पोलादपूर जवळील चांढेवे टोल नाका तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड चिपळूणमधील लोटे येथील टोलनाके बांधून तयार आहेत. रायगड जिल्ह्यातील कासू ते इंदापूर या 42.3 किलोमीटरच्या टोल वसुलीसाठी प्रवाशांना सुकळी खिंडीत वाटण्याची जोरदार तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चालू झालेली आहे. केवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अधिसूचना निघणे बाकी आहे. आणि ती देखील लवकरात निघण्याची शक्यता खाजगी मध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Exit mobile version