खुल्या एलटी बॉक्ससाठी कुणी दरवाजे देता का, दरवाजे…?

महावितरणाचा जीवघेणा कारभार
एलटी बॉक्सच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष
अलिबाग । प्रतीक कोळी |
महावितरणाच्या बागमळा एलटी बॉक्सची दुरावस्था झाली असून याकडे महावितरणाचे दुर्लक्ष झाले आहे. या बॉक्सचे दरवाजे नष्ट झाले असून गेल्या प्रदीर्घ कालावधीपासून एलटी बॉक्स आपल्या नवीन दरवाज्यांच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे कुणी दरवाजे देता का,दरवाजे अशी मागणी आता सर्व सामान्यांतून केली जात आहे.
बागमळामधील हा ट्रान्स्फार्मर विद्युत वितरण बॉक्स साधारतः 400 विद्युतदाबाचा असून तो अलिबाग-रेवंदडा हम रस्त्यालगत, महालक्ष्मी परिसर, नागांव येथे आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेली अनेक वर्ष या बॉक्सचे दरवाजे खुले होते. नंतर त्याला गंज चढल्याने दरवाजे खराब झाले आहेत.
महावितरणाकडे याबाबत कल्पना, तक्रारी देऊनसुद्धा महावितरणाने याकडे लक्ष दिले नाही. याशिवाय महावितरणाच्या नियमांनुसार, रस्त्यालगत असणारा हा बॉक्स इतका खाली आहे की, अजाणत्या वयातील बालके, पाळीव प्राणी यांचा नकळत स्पर्श होऊन एखादा अपघात होण्याची शक्यता आहे.
महावितरणानाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर एलटी बॉक्स नियमांनुसार जमिनीपासून योग्य त्या अंतरावर बसविण्यात आला होता. पण रस्त्यांच्या दुरूस्ती कामात संबधित रस्ता पूर्वीच्या जागेपासून भरावामुळे वर उचलला गेला. यामुळे एलटी बॉक्सचे जमिनीपासूनचे अंतर कमी झाले आहे. अर्थात महावितरणाने कितीही सावरण्याचा प्रयत्न केला तरी रस्तादुरूस्तीमुळे उद्भवणार्‍या या समस्येकडे महाविरणने लक्ष देणे आणि तशी कार्यवाई करून आवश्यक ती भूमिका घेणे, महावितरणाची जबाबदारी असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. वीजदेयकांचा भरणा न झाल्यास सक्तीने वीज तोडणारे महावितरण प्रशासन ग्राहकांच्या सेवासुविधेकडे तथा सुरक्षिततेकडे दुर्लक्ष का करते? एखादा घातपात घडल्यास महावितरण याची जबाबदारी घेणार आहे का? आणि घेतल्यास, यामध्ये देण्यात येणारी नुकसान भरपाईची रक्कम संबंधित व्यक्ती अथवा पशुची उणीव पुरी करू शकेल का? असे प्रश्‍न स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.


बागमळा एलटी बॉक्स खूप खराब झाला असून यासंबंधी योग्य तो अहवाल पाठविला आहे. यामध्ये सदर बॉक्स बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्राप्त उत्तरानुसार, आगामी काळात या बॉक्सची दुरूस्ती वा नुतणीकरण करण्यात येईल. महावितरण ग्राहकांच्या सेवेत तत्पर आहे.
परमानंद बैकर- सहाय्यक अभियंता, चौल-01, शाखा.

Exit mobile version