मूकबधीर विद्यार्थ्यांची सरकारकडून चेष्टा

विद्यालयाचे काम रखडले; तीन वर्षे होत आली, तरीही काम कूर्मगतीने


। अलिबाग । प्रतिनिधी ।

जीर्ण मूकबधीर विद्यालयाच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी भूमीपूजन सोहळा थाटामाटात झाला. ते काम वर्षभरात पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, हा अपेक्षाभंग झाला आहे. इमारतीचे बांधकाम आजही कूर्मगतीने सुरु आहे. त्याचा परिणाम प्रशासनाच्या अनास्थेमुळे भाडे तत्त्वावरील इमारतीमधून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पावसाळ्यात त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

मूकबधीर विद्यार्थी शिक्षणातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे यासाठी समाजकल्याण विभागाने 1986 मध्ये अलिबागजवळील विद्यानगर या ठिकाणी शासकीय मूकबधीर विद्यालय बांधले. या जुन्या इमारतीची अवस्था बिकट झाली होेती. भिंतींना तडे गेले होते. खिडक्यांच्या काचा तुटल्या होत्या. प्लास्टरही वारंवार पडत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. अखेर भाडेतत्त्वावरील इमारतीमधून विद्यालय सुरू करण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून विद्यार्थ्यांना भाड्याच्या शाळेत शिक्षण दिले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. ज्या ठिकाणी शाळा आहे, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

जीर्ण झालेल्या मूकबधीर विद्यालयाच्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी 15 ऑगस्ट 2021 मध्ये भूमीपूजन सोहळा तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. मोठा थाटामाटात हा सोहळा भरपावसात पार पडला. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दोन कोटी 46 लाख 92 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. मूकबधीर विद्यार्थ्यांना हक्काची शाळा मिळणार असल्याने आनंदी वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यांची घोर निराशा प्रशासनाने केल्याचे समोर आले आहे. मूकबधीर विद्यालयाच्या नव्या इमारतीचे काम संथ गतीने सुरू आहे. दहा टक्केदेखील काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. इमारतीच्या बांधकामासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदाराला 53 लाख रुपयांचा निधी वर्ग केला आहे. मात्र, काम कूर्मगतीने सुरु आहे.

असे आहे विद्यालय
अलिबाग तालुक्यातील विद्यानगर भागातील 31 गुंठे परिसरात मूकबधीर शाळेसाठी इमारत बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी उद्यान, क्रीडांगण असून, एक मजली इमारत बांधण्यात येणार आहे. यामध्ये आठ वर्ग खोल्या, मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र निवासस्थान, विद्यालयातील अधीक्षकांसाठी कार्यालय व निवासस्थान, श्रवण चाचणी खोली, वैद्यकीय कक्ष, अंतर्गत खेळाची खोली व सुसज्ज असे सभागृह असणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दोन कोटी 46 लाख 92 हजार रुपये खर्च केला जाणार आहे.
भाड्यापोटी 13 लाख रुपये खर्च
नव्या मूकबधीर विद्यालयाचे काम सुरु आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना भाड्याच्या शाळेत शिक्षण दिले जात आहे. दर महिन्याला सुमारे 22 हजारांहून अधिक रुपये भाड्यापोटी खर्च केले जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून आतापर्यंत सुमारे 13 लाख रुपये हून अधिक खर्च भाड्यापोटी झाल्याचे समोर आले आहे. या विद्यालयात 15 विद्यार्थी असून, त्यांना तीन शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे.
काम करण्यासाठी एक वर्षांची मुदत
विद्यानगर येथील मूकबधीर विद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन ऑगस्ट 2021 मध्ये झाले. वर्षभरात या इमारतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. शिंदे गटातील एका ठेकेदाराला या इमारतीचे काम दिले आहे. वर्ष पूर्ण होऊनदेखील काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे त्यांना परत मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या हे काम सब ठेकेदाराद्वारे केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषद कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे.

मूकबधीर विद्यालयाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झाले आहे. कॉलम टाकण्याचे काम सुरु आहे.

– राहुल देवांग, कार्यकारी अभियंता,
जिल्हा परिषद बांधकाम विभाग

मूकबधीर विद्यालयाच्या इमारतीचे कामाचा आढावा वरिष्ठांनी बैठकीच्या माध्यमातून घेतला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या देखरेखेखाली हे काम सुरु आहे.

– डॉ. शाम कदम, समाजकल्याण अधिकारी,
रायगड जिल्हा परिषद

Exit mobile version