वनरक्षक भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा मृत्यू

| नागपूर | वार्ताहर |

वनरक्षक भरती प्रक्रियेला फेब्रुवारीच्या अखेरीस सुरूवात झाली. मिहान परिसरात उमेदवाराची शारीरिक चाचणी प्रक्रिया पार पडली. सलग चार दिवस चाललेल्या या प्रक्रियेत नागपूर विभागात सुमारे ३० हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. मात्र, शारीरिक चाचणी प्रक्रियेत अव्यवस्था असल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला. त्यांनी या चाचणीवर आक्षेप घेतले, त्यांना पुन्हा एक संधी देण्यात आली. चार मार्चला अशा उमेदवारांची पुन्हा शारीरिक चाचणी घेण्यात आली. यादरम्यान महिला उमेदवारांना तीन तर पुरुष उमेदवारांना पाच किलोमीटर धावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. सोमवारी, (दि.4) मार्चला सकाळी सात वाजता मिहान परिसरात ही स्पर्धा सुरू झाली. यात यवतमाळ जिल्ह्यातील सचिन लांबट हा युवक देखील सहभागी होता. सकाळी स्पर्धेला सुरुवात झाली आणि अंतिम टप्पा गाठण्यासाठी अवघे दहा ते पंधरा मीटरचे अंतर बाकी असताना सचिन लांबट हा उमेदवार मैदानावर चक्कर येऊन खाली पडला.

वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्याला तंबूत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आपण हे अंतर पूर्ण करणार असे सांगितले. त्याला पुन्हा संधी देण्यात येईल असे सांगून त्याला तंबूत आणले आणि डॉक्टरांनी तपासणी केली. त्याचा रक्तदाब थोडा कमी झाला होता. प्राथमिक औषधोपचार करत त्याला तेथेच थोडावेळ आराम करण्यास सांगण्यात आले. थोड्यावेळाने रुग्णवाहिका आली आणि एम्स रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले. त्यावेळीसुद्धा त्याची प्रकृती चांगली होती. त्याच्यासाठी वनखात्याचे दोन कर्मचारीही तैनात करण्यात आले होते. रात्री पुन्हा त्याची प्रकृती खराब झाली आणि त्याचा मृत्यू झाला. वनखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. प्राथमिक अंदाजानुसार त्याची किडनी निकामी झाली होती. मात्र, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे.

स्पर्धेत सहभागी उमेदवारांकडे शारीरिक सुदृढ असल्याचे आरोग्य प्रमाणपत्र असल्यानंतरच त्याला या स्पर्धेत सहभागी होऊ दिले जाते. पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया पार पडल्यानंतरही ही घटना कशी घडली, याचा आम्हालाही धक्का बसला आहे. आम्ही आमच्याकडून या उमेदवाराच्या कुटुंबियांना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत.

श्रीलक्ष्मी, वनसंरक्षक
(प्रादेशिक)
Exit mobile version