दहा वर्षात निवृत्त 4500 एसटी कर्मचार्यांच्या मृत्यूनंतर
त्यांच्या पत्नीचा देखील निवृत्तीवेतन न घेताच मृत्यू
एसटीतील सेवानिवृत्तांना निवृत्तीवेतनाची रक्कम द्या
जयंत पाटील यांच्यासह 12 आमदारांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातून मागील अडीच वर्षात निवृत्त झालेल्या सहा हजार कर्मचार्यांची एकूण रुपये 150 कोटींची तसेच विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या चारशे निवृत्त कर्मचार्यांच्या कुटुंबियांची देणी महामंडळाकडे प्रलंबित आहेत. एसटी महामंडळातून मागील दहा वर्षात निवृत्त झालेल्या सुमारे 4500 कर्मचार्यांचा मृत्यू झाल्यानंतर निवृत्तीवेतन मिळण्यासाठी पाठपुरावा करणार्या त्यांच्या पत्नीचा देखील निवृत्तीवेतन न घेता मृत्यू झाल्याचे माहे ऑगस्ट, 2021 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले असल्याची गंभीर बाब आज विधानपरिषदेत समोर आली. या एसटीतील सेवानिवृत्तांना त्वरीत निवृत्ती वेतनाची रक्कम देण्याची मागणी सभागृहात करण्यात आली.
शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्यासह भाई जगताप, डॉ. वजाहत मिर्झा, राजेश राठोड, अमरनाथ राजूरकर, अभिजित वंजारी, डॉ. सुधीर तांबे, जयंत आसगावकर, विक्रम काळे, बाळाराम पाटील, मोहनराव कदम,विनायकराव मेटे यांनी सदर प्रश्न उपस्थित केला.
सदर उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी आणि कर्मचार्यांची सेवाजेष्ठता अथवा वैयक्तिक कारणांमुळे विविध आगारांमध्ये बदली होत असताना त्यांच्या बदली आदेशासोबत देण्यात येणार्या लास्ट पेमेंट सर्टिफिकेट (अंतिम वेतन प्रमाणपत्र) तसेच निवृत्तीवेतनाबाबतच्या माहितीनुसार नवीन कार्यालयातील संबंधितांकडून त्याबाबतची रक्कम कपात करून तसे प्रमाणपत्र निवृत्तीवेतन कार्यालयाकडे पाठविले जाते. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्यांची बदली झाल्यानंतर काही कर्मचार्यांनी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे दिली नसल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचार्यांना निवृत्तीवेतनापासून वंचित राहावे लागले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातून मागील अडीच वर्षात निवृत्त झालेल्या सहा हजार कर्मचार्यांची एकूण रुपये 150 कोटींची तसेच विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या चारशे निवृत्त कर्मचार्यांच्या कुटुंबियांची देणी महामंडळाकडे प्रलंबित आहेत. एसटी महामंडळातून मागील दहा वर्षात निवृत्त झालेल्या सुमारे 4500 कर्मचार्यांचा मृत्यू झाल्यानंतर निवृत्तीवेतन मिळण्यासाठी पाठपुरावा करणार्या त्यांच्या पत्नीचा देखील निवृत्तीवेतन न घेता मृत्यू झाल्याचे माहे ऑगस्ट, 2021 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले.
याप्रकरणी शासनाने चौकशी करुन सेवानिवृत्तीनंतर त्वरीत एसटी महामंडळातील कर्मचार्यांना निवृत्तीवेतन सुरु करण्याबाबत तसेच सेवानिवृत्त झाल्यापासून त्यांच्या सर्व निवृत्तीवेतनाची रक्कम त्यांच्या वारसांना मिळण्याबाबत कार्यवाही करुन संबंधित दोषींविरुध्द कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे.
यावर परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी ही वस्तुस्थिती मान्य करत निवृत्ती वेतनाची रक्कम कर्मचार्यांच्या वेतनातून कपात करून तसे प्रमाणपत्र निवृत्तीवेतन कार्यालयास पाठविले जात असल्याचे सांगितले. परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या राज्य कर्मचारी / अधिकारी यांच्या पत्नींबाबत राज्य परिवहन महामंडळाकडे नोंदी नसतात असेही ते म्हणाले. यासंदर्भात अपर केंद्रीय भविष्य निर्वाह निधी भवन, मुंबई यांचे कार्यालयात राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने पत्रव्यवहार करण्यात आलेला असून, राज्य परिवहन महामंडळातील निवृत्त कर्मचार्यांना व मृत झालेल्या कर्मचार्यांच्या वारसांना वेळेवर कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणेकामी जे दावे संगणकीय प्रणालीवर सादर करता येत नाहीत वा संगणकीय प्रणालीवर माहिती भरण्यास अडचण निर्माण होत आहे. असे दावे पुर्वीप्रमाणेच ऑफलाईन पध्दतीने स्विकारण्याबाबत विनंती केलेली आहे. आजमितीस महामंडळाकडे सन 2012 ते 2021 या कालावधीतील मृत कर्मचार्यांचे एकूण 231 दावे प्रलंबित आहेत. सदर दावे निकाली काढण्यासाठी परिपत्रकीय सूचना देण्यात आहेत व त्याप्रमाणे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती अॅड अनिल परब यांनी सभागृहास दिली.
पेन्शन, पेन्शन करीत एसटी कर्मचार्यांचा मृत्यू
