पोलिसांचा कडेकोट फौजफाटा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाड येथील किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची 345 वी पुण्यतिथी व शिवसमाधी जीर्णोद्धार शताब्दी सोहळा उद्या शनिवारी (दि.12) केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने 20 हजारांहून अधिक शिवभक्त गडावर दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंत्र्यांच्या सुरक्षेपासून अन्य सेवासुविधा पुरवण्यापर्यंत रायगडावर शाही थाट असणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद आरोग्य विभागही सतर्क असून, वेगवेगळ्या वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका, तात्पुरता दवाखाना आदी यंत्रणा याठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे. महाडमधील पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातमध्ये 20 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे तात्काळ उपचारासाठी वेगवेगळी औषधांचा पुरवठा उपलब्ध करण्यात आला आहे. महादरवाजापासून पार्किंग व अन्य ठिकाणी सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांसोबत वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सहाजण असणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत अतिदक्षता विभागाची उभारणी करण्यात आली आहे. पाच बेडचा दवाखाना गडावर उभारण्यात आला आहे. होळीचा माळ, राजसदर, रोप वे अप्पर व लोअर स्टेशन, समाधी परिसरात वैद्यकीय पथक अशी व्यवस्था करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे चक्कर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. किल्ले रायगडावर व रोहा सुतारवाडी या ठिकाणी प्रत्येकी चार अशा आठ रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची नेमणूक केली आहे. औषधांसह विंचू, सर्पदंश लसीचा साठाही उपलब्ध केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत पाटील यांनी दिली.
वीस एसटी बसची व्यवस्था
शिवभक्तांना गडापर्यंत ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळ रायगड विभागाकडून 20 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. महाड आगारातून दहा व पेण, माणगाव आगारातून प्रत्येकी पाच अशा दहा बसेसची सोय केली असल्याची माहिती एसटी महामंडळ रायगड विभागाचे नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
35 हजार पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था
वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका नाकारता येत नाही. पुण्यतिथी व अभिवादन कार्यक्रमाला येणार्या शिवभक्तांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 35 हजारांहून अधिक बिसलरीच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गडावर आणि हत्ती तलावाच्या ठिकाणी फिल्टर पाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
संपूर्ण रायगड जिल्ह्यातून मोठा पोलीस फौजफाटा रायगड आणि परिसरामध्ये दाखल झालेला आहे. अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असे एकूण सुमारे एक हजारहून अधिक पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणादेखील गेली काही दिवसांपासून या ठिकाणी तळ ठोकून आहे. त्यांच्या निर्देशाप्रमाणे या ठिकाणी पोलीस बल तैनात केले गेले आहे.
शाहांच्या दिमतीला इलेक्ट्रिक कार
रायगडावर अमित शहा हे इलेक्ट्रिक कारने प्रवास करणार आहेत. किल्ले रायगडावर होळीचा माळ ते जगदीश्वर मंदिर यादरम्यान प्रवास करणार असून, त्या ठिकाणी माती टाकून रस्ता बनवण्यात आला आहे. त्याठिकाणी इलेक्ट्रिक कारची चाचणी करण्यात आली आहे.