पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा मृत्यू

| पालघर | प्रतिनिधी |

भाईंदरमध्ये पोलिसांवर उकळते पाणी टाकल्याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या हल्ल्यात पाच पोलीस जखमी झाले होते. त्यातील अजय चौबे (60) या आरोपीचा शनिवारी ठाणे कारागृहात मृत्यू झाला आहे. चौबे याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
भाईंदर पश्चिमेच्या गीतानगर मधील वालचंद प्लाझा या इमारतीत बी विंग फ्लॅट नंबर 204 प्रतिभा तांबडे यांच्या मालकीचा असून हा फ्लॅट अजय चौबे याला भाडे तत्वावर देण्यात आला होता. चौबे याचा भाडे करार संपल्यानंतर देखील तो फ्लॅट खाली न करता त्याने घरावर कब्जा केला होता. घर मालक फ्लॅट खाली करण्यासाठी गेल्या असता त्याने घरमालक महिलेला मारहाण केली होती. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी भाईंदर पोलिसांचे एक पथक 31 जुलै रोजी या प्रकरणाचा पंचनामा करण्यासाठी चौबे यांच्या घरी गेले होते. यावेळी अजय चौबे यांची पत्नी व मुलाकडून पोलिसांच्या अंगावर उकळते पाणी फेकून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत गायकवाड यांच्यासह हवालदार दीपक इथापे, किरण पवार, शिपाई रवी वाघ, शिपाई सलमान पटवे व पंच विजय सोनी हे जखमी झाले होते.

या घटनेनंतर या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करून पोलिसांनी अजय चौबे, त्याचा मुलगा अभय चौबे आणि पत्नी अनिता चौबे यांना अटक केली होती. न्यायालयाने या आरोपींना 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले होते. शनिवारी (दि.10) ऑगस्ट रोजी सकाळी अचानक अजय चौबे (60 ) यांना श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला होता. यामुळे त्यांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्याच दिवशी दुपारच्या सुमारास अजय यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजय यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन व इतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version