| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पाताळगंगा हे औद्योगिक क्षेत्र असल्याने निवासी संकुले उभारण्यासाठी अनेक बिल्डरांनी परिसरात पाय रोवले आहेत. तर, काही बिल्डरांकडून इमारतींची कामेही सुरू आहेत. परंतु, काही बिल्डरांकडून नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी परिसरात वाढू लागल्या आहेत. कराडे खुर्द ग्रामपंचायत हद्दीत सिध्देश्वरी कॉर्नरजवळ असणारे दिव्या अॅन्टिलिया बिल्डींगमधील एका फ्लॅटधारकाची बिल्डरने फसवणूक केल्याबद्दल रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराडे खुर्द येथील अभिषेक रघुनाथ पाटील यांनी 19 डिसेंबर 20 रोजी दिव्या अॅन्टिलिया बिल्डींगमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. खरेदी केल्यानंतर बिल्डरकडून ओसी मिळण्यासाठी अभिषेक पाटील यांनी वारंवार तोंडी व लेखी स्वरुपात मागणी केली होती. दिव्या अॅन्टिलियाचे बिल्डर अशोक वासाणी यांनी अभिषेक पाटील यांना आमचे येथे फ्लॅट खरेदी करा, भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यावर खरेदी केलेला फ्लॅट दुप्पट किमतीत विकला जाईल असे अमिष दाखवून अभिषेक पाटील यांच्याकडून फ्लॅट खरेदीसाठी 13 लाख रुपये, रजिस्ट्रेशन फीकरिता 65 हजार रुपये, भोगवटा प्रमाणपत्र लवकर आणण्यासाठी व सोसायटी स्थापन करण्यासाठी 4 लाख 50 हजार रुपये असे एकूण 18 लाख 15 हजार रुपये घेतले. परंतु, अद्याप त्यांना भोगवटा प्रमाणपत्र न दिल्याने अभिषेक पाटील यांनी रसायनी पोलीस ठाण्यात बिल्डर अशोक वासाणी आणि आर्किटेक्ट धर्मेश भल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली असता रसायनी पोलीस ठाण्यात या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुढील तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अली अहमद मुल्ला हे करीत आहेत. बिल्डरांकडून नागरिकांनी प्लॅट अथवा दुकानाचे गाळे खरेदी करताना बिल्डरची शहानिशा करून कागदपत्रांची माहिती करुन घ्यावी, असे आवाहन रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी केले आहे.